
Pune News: Humanitarian work showing vigilance of security guards at Wakdewadi, Baramati bus stands
पुणे : वाकडेवाडी आणि बारामती बसस्थानकांवर घडलेल्या घटनांमध्ये स्थानक अधिकारी व सुरक्षारक्षकांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलेला मदत करून घरी पाठविण्यापासून ते अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या तत्पर कृतीपर्यंत, कर्मचाऱ्यांनी मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले.
४ नोव्हेंबर रोजी वाकडेवाडी बसस्थानकावर शिर्डी–शिवाजीनगर बसमधून एक प्रवासी महिला आपल्या मुलांसह आली होती. कौटुंबिक वादामुळे ती रागाच्या भरात घर सोडून आली होती. मात्र काही वेळानंतर शांत झाल्यावर तिला परत जायचे होते, परंतु तिच्याकडे पैसे नव्हते. हे लक्षात आल्यानंतर महिला सुरक्षारक्षक संगीता थोरात यांनी त्या महिलेला स्थानक प्रमुख डाहके यांच्या कडे नेले. स्थानक प्रमुखांनी महिलेला समजूत काढून परतीच्या प्रवासासाठी तिकीटाचे पैसे दिले. त्यानंतर सुरक्षारक्षक थोरात यांनी स्वतः तिकीट काढून त्या महिला व तिच्या मुलांना परतीच्या बसमध्ये सुरक्षित बसवून दिले.
तसेच, ३ नोव्हेंबर रोजी वाकडेवाडी बसस्थानकावर बारामतीहून आलेली सुमारे १७ वर्षांची मुलगी संशयास्पद स्थितीत आढळली. महिला सुरक्षारक्षक शिंदे आणि सुरक्षारक्षक आकाश गोमासे यांनी तिची विचारपूस करून परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले व त्या मुलीला सुरक्षितरित्या पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी बारामती बसस्थानकावर सुरक्षारक्षक वानखेडे आणि चव्हाण हे फेरी घेत असताना सुमारे रात्री १.३० वाजता एका १२ वर्षांच्या मुलीने मदतीसाठी आवाज दिला. एका अज्ञात व्यक्तीने दारूच्या नशेत तिची छेडछाड केल्याचे समजताच, सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीस पकडून बसस्थानकावरील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकीत ठेवून मुलीचा लेखी जबाब घेतला आणि तिला तिच्या मामाच्या स्वाधीन केले. पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.
या तिन्ही घटनांमधून महिला आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची जागरूकता, तत्परता आणि मानवी दृष्टिकोन दाखवला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेले हे संवेदनशील आणि जबाबदार वर्तन आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. अरुण सिया, विभाग नियंञक, पुणे