
important to see women will vote whom after receiving ladki bahin yojana installment money
PMC Elections 2026 : पुणे : आकाश ढुमे पाटील : ‘लाडक्या बहिणी’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) एक महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा झाल्यानंतर पुणे शहराच्या राजकारणात (Pune News) नव्या चर्चेला उधाण आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (PMC Elections 2026) पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल १७ लाख १९ हजार महिला मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या आर्थिक मदतीचा थेट परिणाम मतदानाच्या निर्णयावर होणार का, हा प्रश्न आज केंद्रस्थानी आहे.
महिला मतदार ही पुण्याच्या निवडणुकीतील निर्णायक शक्ती मानली जाते. घरगुती अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर महिलांचा मतदानाचा कल ठरतो. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर खात्यात जमा झालेल्या रकमेने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी गटाकडून ही योजना ‘महिला सक्षमीकरणाचा ठोस पुरावा’ म्हणून मांडली जात असताना, विरोधकांकडून मात्र ‘मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न’ अशी टीका होत आहे.
हे देखील वाचा : पुणे शहर मतदानासाठी सज्ज! 35 लाख मतदार ठरवणार पालिकेचा राजा
पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांपैकी कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार, किंवा इतर पर्यायी निवडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला मतदारांसाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर भर देण्यात आला. एक अलार्म पाच काम माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.महिला स्वयं-सहायता गट, कामगार महिला आणि मध्यमवर्गीय गृहिणींच्या अपेक्षा समजून घेण्याचा सूर प्रचारात दिसून आला.
‘लाडक्या बहिणी’ योजनेचा हप्ता हा विश्वासाचा दाखला
दुसरीकडे, भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ महिलांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. आर्थिक मदतीसोबतच पायाभूत सुविधा, मेट्रो, रस्ते, आरोग्य केंद्रे आणि डिजिटल सेवांमुळे महिलांचे दैनंदिन जीवन सुलभ झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ‘लाडक्या बहिणी’ योजनेचा हप्ता हा विश्वासाचा दाखला असल्याचे सांगत, विकासाच्या मुद्द्यांवर मत मागण्यात आले.
हे देखील वाचा : पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदली; गुन्हे आणि वाहतूक शाखेत मोठा फेरबदल
राजकीय विश्लेषकांच्या मते, महिला मतदार केवळ आर्थिक लाभावर मतदान करत नाहीत. महागाई, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक आणि रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवरही त्यांचा निर्णय ठरतो. त्यामुळे ‘एक महिन्याचा पैसा’ हा केवळ एक घटक ठरू शकतो. अंतिम कौल हा स्थानिक कामगिरी आणि विश्वासार्हतेवर अवलंबून राहणार आहे.
मतदानातून पुणे शहरातील महिला मतदारांचा कौल स्पष्ट होणार असून, तोच निकालाची दिशा ठरवणारा ठरू शकतो. ‘लाडक्या बहिणी’चा हप्ता सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरतो की महिलांचा रोख स्थानिक प्रश्नांकडे वळतो—याचे उत्तर निकालातून समोर येईल.