शाडूच्या गणेश मूर्तींना मागणी वाढली, किंमतीत ३० टक्के वाढ
पुणे/प्रगती करंबेळकर : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींना यंदा विक्रमी मागणी असून, मागील वर्षाच्या तुलनेत किंमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. किंमतीत वाढ होऊनही शाश्वततेच्या दिशेने जाणाऱ्या लोकांचा कल स्पष्ट दिसत असून, पर्यावरणीय जाणीव, सरकारी नियम आणि जागरूकता मोहिमांनी शाडूच्या मूर्तींना प्रचंड मागणी मिळत आहे, असे पुण्यातील मुर्तीकारांनी सांगितले.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना, पुण्यातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ यांसारख्या मूर्तीनिर्मितीच्या पारंपरिक केंद्रांत शाडूच्या मूर्तींची विक्री जोरात सुरू आहे. याआधी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती स्वस्त आणि हलक्या असल्यामुळे लोकप्रिय होत्या. मात्र, पाण्यात महिनोनमहिने न विरघळणाऱ्या या मूर्ती नद्या व तलाव प्रदूषित करतात, जलचरांचा जीव धोक्यात आणतात आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेलाही हानी पोहोचवतात, याचे भान बऱ्याच लोकांमध्ये आल्याने हळूहळू हा बदल होत आहे.
मूर्तिकार अभिजीत धोंडफळे हे पीओपीला स्पष्ट नकार देत म्हणाले, पीओपीची मूर्ती म्हणजे भक्तीच्या नावाखाली निसर्गाला दिलेली हानी आहे. गणपती हा विघ्नहर्ता आहे, मग आपणच निसर्गाच्या मार्गात अडथळा का निर्माण करावा? शाडू, कागद, नैसर्गिक माती यांसारख्या सेंद्रिय साहित्याने बनवलेली मूर्ती ही बाप्पाच्या पूजेसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी दोन्हीकडून योग्य आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ पाणी आणि निरोगी निसर्ग सोडायचा असेल तर हाच एक पर्याय आहे.
मूर्तिकार गणेश लांजेकर म्हणाले, घरी विसर्जनाची सूचना दिल्यामुळे लहान शाडूच्या मूर्तींसाठी विचारणा वाढली आहे, पण मोठ्या पीओपी मूर्तींचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. अशा मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने कॅल्शियम कार्बोनेट पावडर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावी. चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन कसे करायचे याबाबत स्पष्ट आणि पर्यावरणपूरक उपाय योजले नाहीत, तर प्रदूषणाचा धोका टळणार नाही.
शाडूची मूर्ती पर्यावरणीसाठी उपयुक्त आहे असे सांगत मूर्तिकार शैलजा मेध म्हणाल्या, शाडू माती, शेण, पेपर-माची किंवा वनस्पतींची बियाणे वापरून बनवलेल्या मूर्ती पाण्यात काही तासांत विरघळतात आणि कोणतेही हानिकारक अवशेष मागे ठेवत नाहीत. विसर्जनानंतर बियाणे उगवून रोप होणे हा पुनर्जन्माचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देतो. रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक, वनस्पती-आधारित रंग वापरल्याने नदी-तलावातील पाण्याची गुणवत्ता टिकून राहते.