(फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोथरूडमधील गोसावी वस्ती येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाला दिले आहे. आमच्या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसू, असाही इशारा नागरिकांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील गोसावी वस्ती (कोथरूड) येथे आणण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात स्थानिक नागरिकांची प्रकल्पाला सहमती म्हणून नावे देण्यात आली आहेत. मात्र ही नावे विकसकांनी आम्हाला न विचारता घेतली आहेत. असा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच या प्रकल्पातील हस्तांतरण तसेच प्रकल्प रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ८४ नागरिकांच्या सहीचे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाला दिले आहे.
नवराष्ट्रशी बोलताना स्थानिक नागरिक अमित भगत म्हणाले, आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. नेमकं कोणाला कशा पद्धतीने घर मिळणार, याच खुलासा अद्यापही विकसकांनी केला नाही, या प्रकल्पाबाबत आम्हाला अविश्वास आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे वस्तीत, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज यासह अनेक सुविधा नसल्यामुळे रहिवासी यांना अनेक अडचणी येऊ शकतात. याबाबतचा खुलासा आम्ही मागितल्यास काही गुंड दमदाटी करतात. हे गुंड आम्हाला धमकावून जबरदस्तीने समती पत्र घेत आहेत. प्रकल्पाला आमचा विरोध नाही पन आम्हाला विचारात न घेता विकसक परस्पर निर्णय घेत आहेत. हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवणार याचा खुलासा व्हावा, जोपर्यंत प्रकल्पाबाबत खुलासा होत नाही, तोपर्यंत आमचा या प्रकल्पासाठी विरोध राहील, असं ते म्हणाले.
कोथरूडमध्ये गोदामातून अडीच लाखांची रोकड चोरीला; कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल
कोथरूडमधील एका गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख ३९ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. रामबाग कॉलनी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत संतराम चौधरी (वय २७, रा. किष्किंदानगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अश्विन मनोहरलाल मखिजा (वय २९, रा. लुंकड स्कायलाइन सोसायटी, कल्याणीनगर) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मखिजा व्यावसायिक आहेत. कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील इमारतीत त्यांचे गोदाम आहे. मखिजा यांच्याकडे आरोपी चौधरी कामाला होता. मखिजा यांनी गोदामातील खोक्यात दोन लाख ३९ हजार रुपयांची रोकड ठेवली होती. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चौधरीने खोक्यातील रोकड चोरून नेली. सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. अडागळे तपास करत आहेत.






