पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास (फोटो- istockphoto)
पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास
दोन्ही मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला
रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होतोय फायदा
पुणे: पुणे रेल्वे विभागातील दौंड-मनमाड आणि पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे या दोन्ही मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला आहे. गाड्यांचाी संख्या देखील वाढल्या आहेत.याचा फायदा रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होत आहे.एकूण ९२५ किमी लोहमार्गापैकी ५८८ किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले.
मध्य रेल्वे विभागात पुणे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुण्यासह दौंड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी ही प्रमुख स्थानके आहेत. यातील पुणे ते दौंड, पुणे ते लोणावळा, दौंड ते मनमाड आणि पुणे ते मिरज या मार्गावर प्रवासी गाड्यासह मालवाहतूक गाड्यांची कायम वर्दळ असते. त्यात या दोन्ही मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे. यापूर्वी एकाच ट्रॅकवर गाड्या क्रॉसिंगसाठी थांबवाव्या लागत असल्याने विलंब होत होता. मात्र आता दुहेरी मार्ग उपलब्ध झाल्याने गाड्यांना थांबावे लागणार नाही.
परिणामी या वेळेची बचत होत आहे. प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यामुळे वेळेच्या बचतीसह प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या प्रवासी, मालवाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हे दुहेरीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तर नव्याने झालेला अहिल्यानगर ते बीड आणि लोणंद ते फलटण हे दोन्ही मार्ग एकेरी आहेत.
विभागातील दुहेरी रेल्वेमार्ग
मार्ग किमी
पुणे-दौंड ७७.३३
पुणे-लोणावळा ५९
पुणे-मिरज २७९.५
दौंड-येवला १७३.७५
विभागातील एकेरी रेल्वेमार्गाची आकडेवारी (किमीमध्ये)
मिरज-कोल्हापूर २७.३५
लोणंद-फलटण २६.६५
दौंड-बारामती ४१.८
अहिल्यानगर-आष्टी ६७.१८
आष्टी-अमळनेर ३२.८४
अमळनेर-ऐेगवाडी ३३.१२
पुणतांबा-शिर्डी १७
गेल्यावर्षी पुणे ते मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता दौंड मनमाड लोहमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण पुणे विभागात दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण होणार आहे. याचा फायदा रेल्वेसह प्रवाशांना होणार आहे.
हेमंत कुमार बेहेरा,
जनसंर्पक अधिकारी, मध्य रेल्वे






