पिंपरी-चिंचवडकरांचा Metro ला मिळतोय मोठा प्रतिसाद; मात्र PMP कडे दुर्लक्ष, कारण काय?
सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोने शनिवार आणि रविवार तिकीटदरात मुभा दिली आहे. त्यामुळे वीकेंड पर्यटन, खरेदी, बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो अधिक किफायतशीर पर्याय ठरत आहे.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात ‘पीएमपीएमएल’च्या बस सेवा नागरिकांचा प्रमुख प्रवासाचा आधार मानल्या जात असल्या तरी, वाढते तिकीटदर, वेळेचे पालन न होणे, सेवा अस्वस्थ करणारी आणि अस्वच्छ वातावरण यामुळे सध्या प्रवासी मेट्रोकडे वळत आहेत. भाडेवाढीनंतर अवघ्या महिन्याभरात मेट्रोच्या प्रवासात दररोज सुमारे १.७ लाख (१५०–१७० हजार) इतकी आहे. दुसरीकडे, पीएमपीच्या प्रवाशांमध्ये १०.०१ लाख घट झाली आहे, म्हणजे समारोहात सुमारे 15 हजार प्रवाशांची घट नोंदली गेली आहे.
भाडेवाढ आणि सेवा घसरण यामुळे नाराजी
पीएमपी प्रशासनाने १ जूनपासून भाडेवाढ करत किमान तिकीट ५ रुपयांवरून थेट १० रुपये केले, तर मासिक पासचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवले. स्वतंत्र पास रद्द करून एकच ७० रुपयांचा पास (महापालिका हद्दीत) आणि पीएमआरडीए हद्दीत १२० रुपयांचा पास १५० रुपयांचा करण्यात आला. परिणामी, अनेक मार्गांवर २५ रुपयांचे तिकीट आता ५० रुपयांवर गेले आहे. यामुळे सर्वसामान्य कामकाजाच्या प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडले असून, ‘पीएमपी’ने प्रवास करताना प्रवाशांना तिकीटवाढीबरोबरच वेळेवर बस न मिळणे, ब्रेकडाउन, चालक-वाहकांचे उद्धट वर्तन, बस थांब्यांची कमतरता, गर्दी, अस्वच्छता यांसारख्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
परवडणारा आणि सुटसुटीत पर्याय
दुसरीकडे, मेट्रोचा प्रवास तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त, वेळेवर, हवेशीर आणि सुरक्षित असल्याने प्रवाशांमध्ये ती पसंतीस उतरली आहे. उदाहरणार्थ:
पिंपरी ते रामवाडी प्रवास ‘पीएमपी’त ५० रुपये, मेट्रोत ३५ रुपये
पिंपरी ते नळस्टॉप ‘पीएमपी’त ४० रुपये, मेट्रोत ३० रुपये
सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोने शनिवार आणि रविवार तिकीटदरात मुभा दिली आहे. त्यामुळे वीकेंड पर्यटन, खरेदी, बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो अधिक किफायतशीर पर्याय ठरत आहे. याशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंगवरही दररोज सवलत देखील देण्यात येते. मेट्रो अॅप, क्यूआर कोड, कार्ड किंवा डिजिटल पेमेंट पद्धतीने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना दररोज सवलतीचा लाभ मिळत आहे.
“म्हणून मेट्रोला प्राधान्य”
वातानुकूलित कोच व आरामदायी प्रवास, स्मार्ट कार्ड आणि QR पेमेंटसारखी डिजिटल तिकीट यंत्रणा, स्वच्छता, लिफ्ट्स, सुरक्षा व्यवस्था, महिलांसाठी आरक्षित कोच, वेळेवर सेवा व अत्यल्प ब्रेकडाऊन यामुळे नागरिक आता घरातून बाहेर पडताना बसऐवजी मेट्रोकडे वळत आहेत.
कामगार आणि विद्यार्थ्यांवर परिणाम
दररोज पिंपरी हून पुण्यात कामावर जाणाऱ्या अनेक कामगार आणि विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या तुलनेत ‘पीएमपी’ने प्रवास करताना फक्त तिकीट महाग नाही तर वेळेची अडचणही असण्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठीही मेट्रोचा दर आणि वेळेची काटेकोरपणा अधिक उपयुक्त ठरत आहे. मासिक पास योजनांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांनाही मेट्रोचा पर्याय परवडू लागला आहे.
‘पीएमपी’ने सेवा सुधारण्याची गरज
दरवाढ करूनच तोट्याची भरपाई करणे हा शाश्वत उपाय ठरत नाही. बसची वेळेवर उपलब्धता, कर्मचारी प्रशिक्षण, वाहतुकीच्या वेळा सुधारणे, बस थांब्यांची सुधारणा आणि तिकीट व्यवस्थेतील पारदर्शकता या बाबींकडे ‘पीएमपी’ने लक्ष देणे गरजेचे आहे.
एकात्मिक सार्वजनिक वाहतूक हवी
शहरातील मेट्रो आणि पीएमपी दोघेही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रो स्थानकांशी थेट जोडणाऱ्या फिडर बस सेवा, एकत्रित तिकीट प्रणाली (मेट्रो + पीएमपी पास) आणि दोन्ही सेवांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे.
“दररोज पिंपरीहून पुण्यात ऑफिसला जातो. पूर्वी पीएमपीने प्रवास करायचो, पण भाडेवाढ झाल्याने प्रवास देखील महागला आहे. मेट्रोमुळे आता वेळही वाचतो आणि प्रवासही आरामदायी आहे.”
– नितीन सोनवणे, प्रवाशी
मेट्रोत महिलांसाठी आरक्षित कोच आणि सुरक्षितता आहे. पीएमपी बसमध्ये गर्दीत उभं राहणं त्रासदायक होतं. आता मेट्रोने रोजचा प्रवास सोपा झाला आहे.”
– संगीता ठाकरे, प्रवासी.
Web Title: Metro is getting a huge response from pimpri chinchwad residents marathi news