मुंबई: पुणे शहरात महानगर पालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक कामाचे ‘ थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची अदायगी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील कामाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य बापू पठारे यांनी सहभाग घेतला.
चर्चेच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, पुणे महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या कामांचे मेसर्स इआयएल कंपनी मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येत आहे. पथ विभागामार्फत पुणे शहरात पहिल्या टप्प्यात ८ कोटी ३० लाख रुपयांच्या कामामध्ये ४ कामे पूर्ण करण्यात आली असून तीन कामे प्रगतीपथावर आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. यामधील काही कामांना कार्यादेश देण्यात आले असून काही निविदा स्तरावर आहे.
नियमानुसार डांबरीकरणाची कामे केलेल्या तीन वर्षे आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्याबाबत पाच वर्ष कंत्राटदारांना डागडुजीचे दायित्व असते. त्यानुसार पथ विभागामार्फत झालेल्या कामांमध्ये निकृष्टता असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेनंतर होर्डिंग्जबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
राज्यातील आणि मुंबईतील धोकादायक असणारी एक लाख ९ हजार ३८७ होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडली. अशा घटना राज्यात घडू नयेत यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेकडून करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील महानगरपालिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका व नगरपरिषद, नगरपंचायती क्षेत्राकरिता वेगवेगळे जाहिरात धोरण निर्गमित करण्यात आले आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत सूचना सर्व महानगरपालिका व नगरपरिषद, नगरपंचायतींना देण्यात आली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग, उंच लोखंडी मनोरे, मोबाईल टॉवर, लोखंडी कार पार्किंग मनोरे इत्यादीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Uday Samant: घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेनंतर होर्डिंग्जबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सगळ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सगळ्या महानगरपालिकांचे ऑडिट रिपोर्ट आलेले आहेत.