राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार
मुंबई: राज्यातील आणि मुंबईतील धोकादायक असणारी एक लाख ९ हजार ३८७ होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडली. अशा घटना राज्यात घडू नयेत यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेकडून करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. या बाबतचा प्रश्न सदस्य योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य विजय वडेट्टीवार, अमित साटम, जितेंद्र आव्हाड, सुभाष देशमुख, चेतन तुपे, वरूण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील महानगरपालिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका व नगरपरिषद, नगरपंचायती क्षेत्राकरिता वेगवेगळे जाहिरात धोरण निर्गमित करण्यात आले आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत सूचना सर्व महानगरपालिका व नगरपरिषद, नगरपंचायतींना देण्यात आली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग, उंच लोखंडी मनोरे, मोबाईल टॉवर, लोखंडी कार पार्किंग मनोरे इत्यादीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सगळ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सगळ्या महानगरपालिकांचे ऑडिट रिपोर्ट आलेले आहेत.
पुण्यातील ‘ते’ होर्डींग महापालिकेकडून जमिनदोस्त
टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या वादग्रस्त होर्डिंगला सांगाडा महापालिकेने मंगळवारी सकाळी पुन्हा पाडला. यासंदर्भात पत्रकारांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले.महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दीड वर्षापूर्वी परवानग्या दिल्याने टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागच्या बाजूला तीन होर्डिंग एकत्र करून एकच भले मोठे होर्डिंग उभारले होते.
Pune News: पुण्यातील ‘ते’ होर्डींग महापालिकेकडून जमिनदोस्त; नेमके प्रकरण काय? पहाच…
यावर प्रसार माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर, होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळविण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते. या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, त्याच होर्डिंग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे.