
पीएमपीकडून ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय
बससेवा वेळेवर करण्यासाठी विशेष उपक्रम
चालक-वाहकांपासून डेपो व्यवस्थापकांपर्यंत देखरेख
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह बससेवा मिळावी, यासाठी ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात (Pune) बस वेळेवर सुटणे, ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणे, तसेच चालक व वाहक वेळेवर हजर राहणे यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या व वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या पुढाकाराने यापूर्वी फिल्ड वीक आणि स्वच्छता आठवडा हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले होते. या कालावधीत बससेवेतील स्वच्छता, तांत्रिक स्थिती, कर्मचारी कामकाज आणि प्रवाशांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरू असून, आता पुढील टप्प्यात वक्तशीरपणा हा केंद्रबिंदू मानून ‘पंक्चालिटी वीक’ राबवला जाणार आहे.
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…
या आठवड्यात बस फेऱ्यांची वेळपालन टक्केवारी, उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा, तसेच वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी केली जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे होणारे विलंब कमी करण्यासाठी वर्कशॉप पातळीवर तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाकडून रिअल टाइम मॉनिटरिंग करून उशिराने धावणाऱ्या बसवर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.
प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बस उशिराने आल्यास थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. कामावर जाणारे नोकरदार, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा खोळंबा होतो. यामुळे पीएमपीबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊन खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होतो.कर्मचाऱ्यांचे सतत गैरहजर राहणे, उशिरा कामावर येणे आणि नियमांचे पालन न करणे यामुळे बससेवेत अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर ‘पंक्चालिटी वीक’ दरम्यान दररोज आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न
‘पंक्चालिटी वीक’मध्ये काय असणार?
बस वेळेवर सुटते का याची तपासणी
वेळापत्रकानुसार फेऱ्या पूर्ण होत आहेत का यावर लक्ष
उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा
वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी
तांत्रिक बिघाडांवर तत्काळ दुरुस्ती
नियंत्रण कक्षातून रिअल टाइम मॉनिटरिंग