पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न (फोटो-सोशल मीडिया)
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कडून प्रवाशांसाठी पर्यटन बस सेवा पुरविण्यात येत असून, या सेवेना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात ७६४ प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला असून यातून ३ लाख ८२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात १२८४ प्रवाशांनी प्रवास केला असून, यामधून ६ लाख ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्या व उत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झालेली आहे. विशेषतः पानशेत–वरजगाव आणि लोणावळा या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न
पीएमपीच्या मध्यवर्ती पास विभागास ८ डिसेंबर रोजी एकूण ४० लाख ३३ हजार ११० रुपये इतके उच्चांकी उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये सकाळ व दुपारच्या पाळीत स्वारगेट, हडपसर, निगडी, कात्रज, भोसरी (शिवाजी चौक) आणि पुणे महानगरपालिका या पास केंद्रांवरून एकूण २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. तसेच इतर सर्व पास केंद्रांवर दोन्ही पाळ्यांमध्ये समाधानकारक उत्पन्न प्राप्त झाले आहे.फिरते पास केंद्र, एसएनडीटी कॉलेज मेट्रो स्टेशन येथून २१ हजार १९१ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पास विभाग प्रमुख विकास मते यांनी दिली आहे.
प्रवाशांना पुरवली जाते दर्जेदार सेवा
पर्यटक प्रवाशांना चांगली व दर्जेदार सेवा पीएमपी प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुढील काळात हि संख्या वाढण्याची शक्यता आहे.
– किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
प्रवासी संख्या व उत्पन्न
महिना प्रवासी संख्या उत्पन्न
ऑक्टोबर ७६४ ३ लाख ८२ हजार
नोव्हेंबर १,२८४ ६ लाख ४२ हजार
हेदेखील वाचा : पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?






