
Prashant Jagtap leaves NCP and joins Congress Hadapsar pune political analysis
Pune Politics : आकाश ढुमेपाटील : पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकारण गेल्या काही काळापासून केवळ पक्षनिष्ठेपुरते मर्यादित राहिलेले नाही. तर संधी, गणिते आणि भविष्यातील शक्यतांच्या भोवती फिरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांच्या अलीकडच्या राजकीय निर्णयांकडे पाहिले तर त्यामागील राजकीय व्यवहार्यता आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांचा वेध घेणे अपरिहार्य ठरते.
प्रशांत जगताप हे हडपसर मतदारसंघातून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना या मतदारसंघात चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार असल्याने जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मर्यादित होती. पक्षांतर्गत समीकरणे त्यांच्या विरोधात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय पटावर नवी संधी निर्माण झाली. ती संधी त्यांनी अचूक हेरली, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे असले तरी विरोधक यालाच ‘संधीसाधूपणा’ असे संबोधतात.
हे देखील वाचा : शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण
राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर प्रशांत जगताप यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. निकालात ते सुमारे सात हजार मतांनी पराभूत झाले. आकडेवारी पाहिली तर चेतन तुपे यांना सुमारे १ लाख ३४ हजार मते, तर जगताप यांना सुमारे १ लाख २७ हजार मते मिळाली. मनसेचे साईनाथ बाबर यांना सुमारे ३२ हजार मते मिळाली होती. हा फरक लक्षात घेतल्यास, थोड्याशा राजकीय समीकरणांच्या बदलाने निकाल उलटू शकला असता, हे वास्तव नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे. हडपसरमध्ये पूर्वी काँग्रेसचा आमदार राहिलेला इतिहास, काँग्रेस विचारधारेला मानणारा मतदारवर्ग, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची संभाव्य एकजूट — या साऱ्याचा विचार करून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः मनसेला मिळालेली ३२ हजार मते ही भविष्यात निर्णायक ठरू शकतात, असा अंदाजही बांधला जात आहे.
हे देखील वाचा : राष्ट्रवादीला रामराम करत प्रशांत जगताप करणार ‘या’ पक्षात प्रवेश
राजकारणात महत्त्वाकांक्षा गैर नाही. प्रत्येक नेता आपल्या संधी शोधत असतो, गणिते मांडतो आणि पुढील पावले टाकतो. मात्र, ‘विचारांचा पाईक’, ‘धाडसी निर्णय’ अशा शब्दांत या साऱ्या घडामोडींचे उदात्तीकरण करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, या निर्णयांमागे विचारधारेपेक्षा व्यवहार्य राजकारण अधिक ठळकपणे दिसते, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
एकूणच, राष्ट्रवादी फुटल्यानंतर मिळालेली संधी, त्यानंतर काँग्रेसकडे वळण्याची तयारी आणि भविष्यातील आमदारकीची स्वप्ने या साऱ्यात प्रशांत जगताप यांचा राजकीय प्रवास स्पष्ट होतो. ते संत नाहीत, इतर राजकारण्यांप्रमाणेच तेही संधी, आकडे आणि शक्यता यांचा विचार करून निर्णय घेणारे नेते आहेत. हे वास्तव स्वीकारूनच त्यांच्या राजकारणाकडे पाहावे लागेल, अशीच भावना अनेक जाणकार व्यक्त करतात.