
Prashant Jagtap resignation Sharad Pawar Ajit Pawar NCP alliance Pune Political News
पुण्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र युती करणार आहेत. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचे मनोमीलन होत आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रस्त असल्यामुळे फुट पडू न देता एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे नाराजीनाट्य सुरु झाले आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र तीव्र विरोध केला आहे. प्रशांत जगताप यांनी आपली नाराजी उघड करत अशी युती झाली तर पक्ष सोडण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
हे देखील वाचा : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
काय म्हणाले प्रशांत जगताप?
शरद पवार गटाची अजित पवार गटासोबत होऊ पाहणाऱ्या युतीवर प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?
जगताप यांना डावलून बैठक?
पुण्यामध्ये युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये माजी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला. या समितीमध्ये देखील प्रशांत जगताप यांना घेण्यात आले नाही. यानंतर प्रशांत जगताप यांनी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह बैठक घेतली. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपला राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द देखील केला असून लवकरच ते ठाकरे सेना किंवा कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.