नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पूजा साहित्यासह अलंकार, शस्त्रे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
पुणे/प्रगती करंबळेकर : पुणे शहरांतील विविध मंदीरे आणि घराेघरी शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवार (२२ सप्टेंबर) रोजी आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना हाेत असुन, त्यासाठी आवश्यक पूजा साहीत्यासह, देवीचे साेने – चांदीचे मुखवटे, अंलकार, शस्त्रे खरेदी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.
मंदिरांना आकर्षक विद्युत राेषणाई
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार स्ट्रीट), काळी जोगेश्वरी (बुधवार स्ट्रीट), पिवळी जोगेश्वरी (शुक्रवार स्ट्रीट), चतुश्रृंगी देवी (चतुश्रृंगी), महालक्ष्मी मंदिर (सारसबाग ), पद्मावती मंदिर (पद्मावती), भवानीमाता मंदिर (भवानी पेठ), संतोषीमाता मंदिर (कात्रज), वनदेवी मंदिर (कर्वेनगर) आणि तळजाई देवी मंदिर (तळजाई) यासह इतर देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंदिरांना रंगरंगाेटीसह आकर्षक विद्युत राेषणाई केली गेली आहे. बहुतेक मंदीरात पुरुष आणि महिलांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नऊ दिवसांच्या धार्मिक पूजेच्या तयारीत व्यस्त आहेत. महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग परिसरात धार्मिक पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
सजावटीच्या साहित्याने बाजारही सजवले
मूर्तीच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या भांडी, तांदूळ, माती, परडी, मंडप आणि इतर पूजा साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच चुनरी, भरजरी कापड, दागिने आणि देवीसाठी इतर साहित्य देखील आहे. नागरिक उत्साहाने खरेदी करत आहेत. व्यावसायिक धनंजय घोलप म्हणाले, यावेळी किमती स्थिर असल्याने बाजारात मोठा उत्साह आहे. त्यामुळे लोक खरेदीचा आनंदही घेत आहेत. नवरात्रीसाठी आवश्यक असलेल्या पूजा साहित्याने आणि इतर सजावटीच्या साहित्याने बाजारही सजवला आहे.
फुलांच्या मागणीतही वाढ
या वर्षी शारदीय नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा उत्सव आहे. नवरात्रात प्रत्येक घरात, देवी मंदिरात आणि सार्वजनिक मंडळ, समाज संस्थांकडून घटस्थापना केली जाते. यामुळे देवीच्या नित्य पुजेसाठी आवश्यक हार, माळ यासाठी फुलांची मागणी असते. नवरात्रीच्या पार्श्वभुमीवर फुलबाजारातही मागणी वाढली आहे. पुजेप्रमाणेच सजावटीसाठी फुलांचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जाताे. त्यामुळे पुढील काळात फुलांची मागणी चांगली असेल.