
पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साळेगावकर यांनी शहरातील अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याच्या लाईन ड्रेनेजच्या आतून गेल्याचे म्हटले आहे. ड्रेनेज तुंबल्यास किंवा पाण्याची पाईपलाईन खराब झाल्यास दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊन आरोग्याच्या समस्या तसेच साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
सध्या अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या डी.आय. आणि जी.आय. पाईप ड्रेनेजच्या पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे जीर्ण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जुन्या पाईपमधून गळती होण्याचे प्रमाण वाढल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता आणखी वाढू शकते.
त्यामुळे ड्रेनेज लाईनमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व पाईपलाईन बाहेर काढून स्वतंत्र मार्गाने नवीन HDPE पाईपलाईन टाकावी, अशी मागणी साळेगावकर यांनी केली आहे. HDPE पाईप तुलनेने टिकाऊ असल्याने भविष्यातील गळती आणि दूषित पाण्याचा धोका कमी करण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
महापालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साळेगावकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, अनेक दाट लोकवस्तीच्या भागात मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे पाणी खेचण्यासाठी पाईप टाकले जातात. हे पाईप ड्रेनेज वाहिन्यांच्या अगदी जवळून किंवा थेट त्यामधून नेले जातात. पाईपला गळती (Leakage) झाल्यास ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते. मुख्य जलवाहिन्या बदलल्या असल्या तरी अंतर्गत भागातील छोट्या आणि जुन्या वाहिन्या अजूनही जीर्ण अवस्थेत आहेत, ज्यामुळे गळतीचे प्रमाण वाढते. काही ठिकाणी ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याचे काम करताना योग्य नियोजन न केल्यामुळे या दोन्ही लाईन्स एकमेकांत मिसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर