
आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासातून निष्कर्ष
उष्णकटिबंधीय नद्यांमध्ये मोसमी पूर आल्याने प्रदूषके वाहून जातात आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचे नैसर्गिक मिश्रण पुन्हा प्रस्थापित होते, असे यापूर्वीच्या संशोधनांतून दिसून आले होते. मात्र, मुळा-मुठा नदीच्या बाबतीत पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहाचा परिणाम मर्यादित असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. पूरस्थितीमुळे नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेत काही काळासाठी बदल होत असले, तरी प्रदूषणाची पातळी कोणत्या प्रजाती टिकून राहतील, हे ठरवते.
संशोधक प्रत्याशा नायक आणि डॉ. बालासुब्रमनियन कार्थिक यांनी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत नदीच्या उगमक्षेत्रापासून शहरी आणि औद्योगिक भागापर्यंत १७ ठिकाणांहून पाण्याचे तसेच दगडांवर साचलेल्या जैविक थराचे नमुने गोळा केले. या नमुन्यांच्या आधारे त्यांनी डायटम्स या एकपेशीय सूक्ष्म शेवाळांचा अभ्यास केला. डायटम्सच्या पेशीभोवती सिलिकाचे कवच असते. पर्यावरणातील बदलांना हे सूक्ष्मजीव संवेदनशील असल्याने पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे नदीतील प्रदूषणाचा परिसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी डायटम्सचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
संशोधनात नदीतील एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या डायटम्सच्या प्रजातींची एकूण विविधता वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुलनेने स्थिर असल्याचे आढळले. मात्र, नदीचा प्रवाह उगमक्षेत्राकडून शहरी भागाकडे जाताना प्रजातींच्या रचनेत मोठे बदल झाले. स्वच्छ आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असलेल्या उगमाच्या परिसरात पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती आढळल्या. परंतु, शहरी भागात सांडपाणी आणि पोषकद्रव्यांचे प्रमाण वाढल्याने या संवेदनशील स्थानिक प्रजातींचे प्रमाण घटले. त्यांच्या जागी प्रदूषण सहन करू शकणाऱ्या प्रजातींचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांना दिसून आले.
नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेत होणाऱ्या बदलांमागे पाण्याची विद्युत वाहकता आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे प्रमुख रासायनिक घटक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढल्यास त्याची विद्युत वाहकता वाढू शकते. तसेच, सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण प्रभावित होते. परिणामी, पर्यावरणातील बदलांना संवेदनशील असलेल्या स्थानिक प्रजातींच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.
नदीचे संवर्धन करण्यासाठी केवळ नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे पुरेसे नसून, शहरी सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच, पाण्याच्या गुणवत्तेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे. नदीतील स्थानिक जैवविविधता टिकवण्यासाठी प्रवाह व्यवस्थापनासोबतच प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहानंतरही सूक्ष्मजीवांची नैसर्गिक रचना पूर्ववत होत नसल्याचे निष्कर्ष नदी संवर्धनासाठी प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करतात.