
परीक्षेची वेळ झाली, पण विद्यार्थिनी बाहेरच! पुण्यात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द; नेमकं काय घडलं?
पुणे : देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सण ब्राईट स्कूल हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, केंद्रावर आवश्यक संगणक उपलब्ध नसल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा आज सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी विद्यार्थिनी नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. मात्र, परीक्षा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही परीक्षा घेण्यात आली नाही. केंद्रावर संगणकांची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची संधी मिळाली नाही.
परीक्षा देण्यासाठी वेळेत पोहोचूनही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू होणे अपेक्षित असताना बराच वेळ उलटूनही विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर उभ्या होत्या. परीक्षा कधी होणार, त्यासाठी पुन्हा संधी मिळणार का, याबाबत स्पष्टता नसल्याने केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्कॉलरशिप परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती. अभ्यास, प्रवास आणि परीक्षेची तयारी यासाठी वेळ आणि पैसा खर्च करून विद्यार्थी केंद्रावर पोहोचले होते. मात्र, केवळ परीक्षा केंद्रावर आवश्यक संगणक उपलब्ध नसल्याने परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकाराची जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेबाबत तातडीने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. आता पुण्यात परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा परीक्षा आयोजन आणि व्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.