
Pune NCP Politics sharad pawar group and ajit pawar group alliance prashant jagtap resign
राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून दोन्ही गट एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. मात्र पुण्यात हा राजकीय वादंग थांबताना दिसत आहे. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद दुंभगू न देता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. यासाठी जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला पुण्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी बैठका आणि भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. पुण्यातील या राष्ट्रवादीच्या युतीला खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे. यामुळे हालचाली वाढल्या आहेत.
हे देखील वाचा : काका-पुतण्याचे पुण्यामध्ये मनोमीलन; मात्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज, राजीनामा देण्याचा इशारा
दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची युतीसाठी “गुप्त बैठक” सुरू झाली आहे. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये संभाव्य युती, जागावाटप आणि इतर राजकीय मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील या महत्त्वाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांची बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे. त्याचबरोबर पुणे महापालिका निवडणुकीच्या जागांवर चर्चा तसेच इतर मुद्दे बैठकीत मांडले जाणार आहेत.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?
प्रशांत जगताप देणार राजीनामा
शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या या पुण्यातील नेत्यांच्या बैठकीमधून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना डावलण्यात आले आहे. तसेच प्रशांत जगताप यांनी दोन्ही गटाच्या या युतीवर नाराजी व्यक्त केली. प्रशांत जगताप म्हणाले की, “ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन,” असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.