
फोटो सौजन्य सोशल मीडिया
पुण्यातील कोरेगाव पार्क अॅनेक्स येथे उभारण्यात येणाऱ्या ‘बजाज फिनसर्व्ह कॅम्पस’चे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भारतातील पहिला ‘सेंटिएंट कॉर्पोरेट कॅम्पस’ म्हणून या प्रकल्पाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. एआय आणि आयओटी या तंत्रज्ञानांवर आधारित असलेली ही इमारत तिच्या परिसरातील परिस्थिती आणि तेथे काम करणाऱ्या लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार प्रत्यक्ष वेळेत स्वतःमध्ये आवश्यक बदल करू शकेल.
या समारंभाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, तसेच राज्यातील अन्य मान्यवरदेखील उपस्थित होते. या समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची औद्योगिक ओळख समृद्ध आहे आणि औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख झाला की बजाज कुटुंबाचे नाव घेतले जाणे अपरिहार्य आहे. दिवंगत जमनालाल बजाज हे थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते आणि दूरदृष्टीचे उद्योजक होते. भारताच्या औद्योगिक प्रगतीत आणि राष्ट्रनिर्माणात त्यांचे मोठे योगदान आहे.
गेल्या शंभर वर्षांत बजाज समूह देशाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. वित्तीय सेवा क्षेत्रात या समूहातील बजाज फिनसर्व्हने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वित्तीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत या कंपनीने फिनटेक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. कर्ज, विमा आणि इतर वित्तीय सेवा डिजिटल माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात या कंपनीची मोठी भूमिका आहे. बजाज फिनसर्व्ह कॅम्पस हा देशातील केवळ सर्वांत मोठा कॅम्पस ठरणार नाही, तर तो अत्याधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त असा कॅम्पस असेल.
पुणे शहर हे फिनटेक क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र बनत असताना देशातील सर्वांत मोठा कॅम्पस येथे उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी संजीव बजाज यांचे अभिनंदन करतो. या प्रकल्पामुळे फिनटेक क्षेत्रातील महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल.‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले, “ज्याप्रमाणे आम्ही लाखो नव्या कर्जदारांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाची जबाबदारी जपण्यासही आम्ही कटिबद्ध आहोत. शाश्वतता आणि सर्वसमावेशकता या अधिक चांगल्या भारताच्या निर्मितीशी निगडित असलेल्या एकाच बांधिलकीच्या दोन बाजू आहेत. बजाज फिनसर्व्ह कॅम्पस ही त्या विचारांचीच अभिव्यक्ती असेल.
ते पुढे म्हणाले, “एलईईडी आणि आयजीबीसीच्या जागतिक मानकांनुसार उभारण्यात येणाऱ्या या कॅम्पसमध्ये पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी जवळीक साधणारी रचना, तसेच एआय-आधारित यंत्रणांचा समावेश असेल. हा कॅम्पस पूर्णपणे अक्षय्य ऊर्जेवर चालेल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारलेला असला तरी त्यात भारतीयत्वाची स्पष्ट छाप असेल. देशभरातील कला, वारसा आणि लुप्त होत चाललेल्या कलाप्रकारांनाही येथे स्थान दिले जाईल.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या कॅम्पसची रचना आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून करण्यात येत आहे. हा कॅम्पस तंत्रज्ञानाधारित भविष्याची झलक दाखवणारा असून, भारताच्या वाढत्या वित्तीय आणि तांत्रिक सामर्थ्याचे तो प्रतीक ठरेल.
बजाज फिनसर्व्ह कॅम्पस हे ‘बजाज फिनसर्व्ह’चे कॉर्पोरेट मुख्यालय असेल. कर्जपुरवठा, ठेवी, पेमेंट्स, विमा आणि गुंतवणूक अशा विविध वित्तीय सेवा प्रथमच एकत्र आणल्या जातील. ७२ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या कॅम्पसमध्ये पुण्यातील सर्वांत उंच स्टीलचा टॉवर उभारण्यात येणार आहे. भारतामध्ये एका ठिकाणी कार्यरत असलेले हे सर्वांत मोठे वित्तीय सेवा कार्यालय ठरेल.
‘बजाज फिनसर्व्ह कॅम्पस’ची रचना शाश्वतता, पर्यावरणपूरक डिझाइन आणि कर्मचाऱ्यांचे एकंदरीत कल्याण या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे. या सर्वांचा पाया म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. एआय आणि आयओटी प्रणालींच्या मदतीने हा कॅम्पस हवामानातील बदल, इमारतीतील लोकांची संख्या आणि परिसरातील वेगवेगळी परिस्थिती यांनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकेल.
सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणाच्या साहाय्याने ऊर्जा व पाण्याचा वापर, गर्दीची घनता आणि लोकांची हालचाल यांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करता येईल. यामुळे कामकाज अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल. ‘आयओटी सेन्सर्स’वर आधारलेली येथील प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स प्रणाली ही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सतत लक्ष ठेवेल. तसेच स्वयंचलित यंत्रणा आणि ‘रोबोटिक्स’च्या मदतीने या कॅम्पसमधील विविध कामकाज अधिक सुलभ आणि परिणामकारकपणे पार पाडले जाईल.
‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
नैसर्गिक वारा आणि सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर होईल, अशा पर्यावरणपूरक पद्धतीने या कॅम्पसची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे वातानुकूलनासाठी लागणारी ऊर्जा कमी होण्यास मदत होईल. हा कॅम्पस अक्षय्य ऊर्जेवर चालेल. तसेच ८० टक्के पाण्याचा फेरवापर, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि शून्य कचरा या उद्दिष्टांवर भर दिला जाईल. यामुळे २०३१-३२ या आर्थिक वर्षापर्यंत ‘स्कोप १’ आणि ‘स्कोप २’ उत्सर्जनाच्या बाबतीत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याच्या बजाज फिनसर्व्हच्या उद्दिष्टाला मदत होईल.
या कॅम्पसची रचना निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणीही हिरवळ आणि नैसर्गिक वातावरणाचा अधिक अनुभव मिळेल. येथे विस्तृत हरित क्षेत्रे, दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींची उद्याने, मियावाकी वनक्षेत्रे आणि पुन्हा विकसित करण्यात आलेली स्थानिक जंगलक्षेत्रे तयार केली जातील. जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक वनस्पती प्रजातींचा वापर करण्यात येईल.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सोयीचा विचार करून प्रत्येक मजल्यावर आणि विविध विभागांत हवेची गुणवत्ता आणि तपमान यांवर सतत नजर ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे अधिक आरोग्यदायी असे कार्यालय निर्माण होण्यास मदत होईल. ‘बजाज वन एम्प्लॉयी अॅप’च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कॅम्पसमधील विविध सुविधांचा लाभ घेता येईल. यामध्ये मार्गदर्शन, पार्किंग आणि विविध सुविधांसाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय, कॅम्पसमध्ये एकात्मिक वैद्यकीय केंद्रही असेल. येथे टेलिमेडिसिन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि विशेष आरोग्य सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
या कॅम्पसच्या रचनेमध्ये भारतीय कला आणि हस्तकला परंपरांचा समावेश करण्यात येईल. यामध्ये आजही जपल्या जाणाऱ्या कलांसोबतच लुप्त होत चाललेल्या कलाप्रकारांनाही स्थान दिले जाईल. बजाज फिनसर्व्हच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांचे विविध पैलू आणि त्यातून लाभ घेतलेल्या व्यक्तींचे योगदानही या कॅम्पसच्या रचनेत प्रतिबिंबित होईल.बजाज फिनसर्व्ह कॅम्पस हा ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया, मेड बाय इंडिया’ या भावनेचे प्रतिबिंब असेल.