राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसाचा उन्हाचा फटका बसत आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. असे असताना आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, यवतमाळसह नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर (घाटाचा परिसर) आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये ढगाळ वातावरण राहून अतिशय तुरळक सरी पडू शकतात.
दरम्यान, पावसाच्या कमतरेतमुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. अशातच अहिल्यानगर, रायगड आणि पुण्यासह राज्यातील काही भागांत पावसाने सोमवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाण्याचं संकट काही प्रमाणात दूर होण्यास मदत होण्याची शक्यता असून, पिकांना देखील दिलासा मिळणार आहे.
…तर शेतकऱ्यांसाठी मिळू शकतो दिलासा
अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. राज्यातील अनेक भागांत पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस झाला, तर शेतकरी आणि जनावरांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो.
काय आहे पावसाचा अंदाज?
कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विजांचा कडकडाटही होणार?
काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






