पुरंदर उपसा योजनेतून मोफत पाणी देऊन शेतकऱ्यांना दिलासा; पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू (सौजन्य - एआय)
यंदाचा खरीप हंगाम कसाबसा सरला असून आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. ज्वारीची पेरणी यापूर्वीच झाली असून, हरभरा, गहू या प्रमुख पिकांसह इतर पिकांची पेरणी सुरु आहे. तर ठिकठिकाणी कांदा लागवड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा जनावरे पालन करण्याकडेही कल वाढला आहे. त्यादृष्ट्ने जनावरांसाठी चारा लागवड करताना शेतकरी दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकरी शेतीकामाची गडबड सुरु असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईमुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहेत.
शेतातील उभी पिके जगविण्यासाठी जागविण्यासाठी प्रत्येकजण धडपड करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विहिरीतील पाण्याने आतापासूनच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे भवितव्य काय ? पाणीच मिळाले नाही तर पिके कशी येणार ? पुढील वर्षभर जनावरांना चारा कोठून आणणार? वर्षभराचे धान्य कोठून आणायचे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.
श्री भैरवनाथ प्रतिष्ठानने दिला शेतकऱ्यांना आधार
श्री भैरवनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती व सवलती, अनुदान देण्यासाठी मदत करण्यात येते. तसेच दरवर्षी नवरात्र उत्सवात मुळशी तालुक्यात शिरकोली येथे शिरकाई देवीचे दर्शन घेण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही गावातील नागरिकांना देवीच्या दर्शनाची आस लागली होती. मात्र, शेतकऱ्यांची व्यथा आणि पिकांची दुर्दशा पाहून देवदर्शन पुढील वर्षी करता येईल. मात्र शेतातील उभी पिके वाचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यालाच प्राधान्य देण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला.
बंधारा आणि परिसरातील तलाव पाण्याने घेतले भरून
श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष राजाभाऊ कुंभारकर यंदा देवदर्शन न करता शेतीला पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून स्वखर्चातून पाणी देण्याचा निर्णय घेतला. यास संचालिका वसुंधरा कुंभारकर यांच्यासह प्रतिष्ठानचे सोमनाथ कुंभारकर, महेश मगर, माणिक कुंभारकर, तुकाराम महामुनी शांताराम कुंभारकर, संतोष कुंभारकर, माऊली कुंभारकर, शरद कुंभारकर, सुनिल कुंभारकर, ज्ञानदेव खेडेकर, किरण कुंभारकर यांच्यासह इतर सदस्यांनी पाठींबा व्यक्त केला. त्यानंतर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी योजनेच्या कार्यालयात पैसे जमा करून वनपुरी येथील गाव तलाव, शेरीचा मळा येथील बंधारा आणि परिसरातील तलाव पाण्याने भरून घेतले. तलाव भरल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले.
पिण्याचे पाणी याची मोठी समस्या
यंदा पाण्याची टंचाई प्रचंड असून, पिकांचे भवितव्य तसेच जनावरांना चारा, पिण्याचे पाणी याची मोठी समस्या आहे. पुढील काही महिने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. याची सुरुवात आपल्यापासून करण्याचा निर्णय घेतला. या पाण्यामुळे पिकांना काही प्रमाणात का होईना आधार मिळेल. परिसरातील विहिरी, बोअर यांची पाणीपातळी राखण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काही दिवसांनी पुन्हा पाणी देण्यात येईल.
१. पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती का निर्माण झाली?
पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने ऑक्टोबरमध्येच शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
२. शेतकऱ्यांसमोर सध्या कोणते संकट आहे?
पाण्याअभावी उभी पिके धोक्यात आली असून, ती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे.
३. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोण पुढे आले?
वनपुरी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री भैरवनाथ प्रतिष्ठान शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे आले.






