फोटो सौजन्य सोशल मीडिया
या कारवाईत तब्बल १५ टनांहून अधिक संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ७ लाख २६ हजार १४७ रुपये असल्याची माहिती आहे.
वांजरा ले-आउट येथील ‘मे. रूपम फूड’ या उत्पादन कारखान्यात एफडीएचे पथक अचानक दाखल झाले. त्यावेळी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर नूडल्स तयार करणे, प्रक्रिया करणे आणि पॅकेजिंगचे काम सुरू होते. तपासणीदरम्यान पथकाला उत्पादनाच्या गुणवत्तेसह पॅकेजिंगमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या.
विशेषतः चुकीचे लेबल लावलेले ‘वेज हक्का नूडल्स‘, मोठ्या प्रमाणात खुले नूडल्स आणि संशयित दर्जाचा मैदा कारखान्यात आढळला. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर योग्य माहिती नसणे आणि दिशाभूल करणारे लेबल लावणे यासारख्या बाबी तपासणीत समोर आल्या.
एफडीएच्या पथकाने कारखान्यातून एकूण १५ हजार ८२ किलो संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त केला. या मालाची किंमत ७,२६,१४७ रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा सील करण्यात आला असून, त्याचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कारखान्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, शहराच्या सीमावर्ती वांजरा परिसरात अशा प्रकारचे अवैध उत्पादन युनिट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.
एफडीए आयुक्तांच्या विशेष निर्देशानुसार ही छापेमारी अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) कृष्णा जयपुरकर आणि सहायक आयुक्त अजय सदार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खांडारे व त्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






