
पुण्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी प्रवासी बसवर RTO ची कारवाई; 25.82 लाखांची केली वसुली
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण ९२९ खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१५ बसमध्ये नियमांचे उल्लंघन अथवा त्रुटी आढळून आल्या आहेत. या कारवाईतून एकूण २५ लाख ८२ हजार रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला आहे. आरटीओच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात ४३३ खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५४ बसमध्ये त्रुटी आढळल्या.
दरम्यान, या महिन्यात १२२ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. त्यातून एक लाख ३७ हजार रुपयांचा कर आणि १२ लाख ४३ हजार रुपयांचा दंड, अशी एकूण १३ लाख ८० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात तपासणीचा वेग वाढवण्यात आला. या महिन्यात ४९६ बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६१ बसमध्ये नियमांचे उल्लंघन आढळले.
ऑक्टोबरमध्ये ६३ प्रकरणांचा निकाल
ऑक्टोबरमध्ये ६३ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. त्यातून ९२ हजार रुपयांचा कर आणि ११ लाख १० हजार रुपयांचा दंड, अशी एकूण १२ लाख दोन हजार रुपयांची वसुली झाली. दोन महिन्यांच्या एकत्रित आकडेवारीनुसार, ३१५ बसमध्ये त्रुटी आढळून आल्या असून, १८५ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत एकाही बसला ताब्यात घेण्यात आलेले नाही. खासगी बसचालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी ही तपासणी मोहीम महत्त्वाची ठरत आहे.
काय सांगते आकडेवारी…
एकूण तपासणी : ९२९ बस
त्रुटी आढळलेल्या बस : ३१५
निकाल लावलेली प्रकरणे : १८५
वसूल केलेला कर / दंड
वसूल केलेला कर : २.२९ लाख रुपये
वसूल केलेला दंड : २३.५३ लाख रुपये
एकूण वसुली : २५.८२ लाख रुपये
ताब्यात घेतलेल्या बस : शून्य
1. आरटीओने खासगी प्रवासी बसची तपासणी का केली?
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने नियमांचे उल्लंघन, जादा भाडे आकारणी आणि वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
2. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये किती बसची तपासणी करण्यात आली?
या दोन महिन्यांत एकूण ९२९ खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली.
3. किती बसमध्ये त्रुटी आढळल्या?
तपासणी करण्यात आलेल्या ९२९ बसपैकी ३१५ बसमध्ये नियमांचे उल्लंघन अथवा त्रुटी आढळून आल्या.