दिल्लीच्या प्रदूषणावर पुण्यातून वैज्ञानिक नजर; काही दिवस आधीच मिळतो अंदाज (फोटो - सोशल मीडिया)
नव्या संशोधनामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाला वैज्ञानिक माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होत आहे. आयआयटीएममधील शास्त्रज्ञ सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही प्रणाली हवेच्या गुणवत्तेचा काही दिवस आधी अंदाज देते. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचे ४०० मीटरच्या सूक्ष्म स्तरावर पूर्वानुमान करण्याची या प्रणालीची क्षमता आहे. यासाठी उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती आणि देशभरातील सुमारे ३७० हवेच्या गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरील नोंदींचा वापर केला जातो. दिल्लीतील हिवाळी प्रदूषणामागे हवामानशास्त्रीय घटकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे घुडे यांनी स्पष्ट केले आहे.
जीआरएपीच्या अंमलबजावणीतही उपयोग
हिवाळ्यात तापमानाचे व्युत्क्रमण (व्यस्त वितरण), मंद वारे आणि जमिनीलगतच्या हवेच्या थराची कमी उंची यामुळे प्रदूषके वातावरणात अडकून राहतात. त्यातच पंजाब आणि हरियाणातील शेतातील अवशेष जाळणे, वाहनांची वर्दळ, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामे आणि कचरा जाळणे यांमुळे प्रदूषणाची तीव्रता वाढते.
एअरवाइजमधील निर्णय सहाय्य प्रणालीमुळे…
एअरवाइजमधील निर्णय सहाय्य प्रणालीमुळे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत ओळखण्याबरोबरच उत्सर्जन कमी करण्याच्या विविध उपाययोजनांचा परिणामही तपासता येतो. त्यामुळे प्रदूषणाची स्थिती गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाला निर्बंध लागू करणे, बांधकामांवर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतूक आणि औद्योगिक उत्सर्जन कमी करण्यासारखे निर्णय घेणे शक्य होते.
पाच शहरांत प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन
दिल्लीतील अनुभवाच्या आधारे मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, पुणे आणि जयपूर या शहरांमध्येही एअरवाइज प्रणालीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शहरातील प्रदूषणाचे स्रोत आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार प्रणाली विकसित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्राधारित शिक्षणाच्या साहाय्याने उत्सर्जनाच्या नोंदी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे.
1. ‘एअरवाइज’ प्रणाली काय आहे?
दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा काही दिवस आधी अंदाज घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास मदत करणारी अत्याधुनिक प्रणाली आहे.
2. ‘एअरवाइज’ प्रणाली कोणी विकसित केली?
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) ही प्रणाली विकसित केली आहे.
3. ‘एअरवाइज’ प्रणालीचे नेतृत्व कोणी केले?
आयआयटीएममधील शास्त्रज्ञ सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली.






