
'अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी'; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
श्री सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील श्री सोमेश्वर कारखाना विकास पुरुष अजितदादा पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून हजारो शेतकरी सभासदांच्या संसाराचा आधार आहे. कारखान्याशी शेतकरी, कामगार आणि त्यांची कुटुंबे जोडलेली आहेत. त्यामुळे कारखान्याची प्रगती म्हणजे या सर्वांच्या आयुष्यातील प्रगती होय. कारखाना कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नसून सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत, ही भूमिका अजितदादांनी कायम जपली.
अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक असून त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही प्रत्येकाला जाणवत आहे. मात्र, दादांची शिकवण केवळ दुःखात राहण्याची नव्हती, तर संकटांचा सामना करून पुढे जाण्याची होती. दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेला पोरके होऊ द्यायचे नाही, हा निर्धार करून आपण जबाबदारी स्वीकारली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रचाराच्या निमित्ताने सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अजितदादांच्या आठवणी अनुभवायला मिळाल्या. कुणाच्या घरातील छायाचित्रातून, कुणाच्या डोळ्यांतील अश्रूंमधून, तर कुणाच्या आठवणींतून दादा आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे जाणवले. जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास आयुष्यभर विसरणार नाही. या प्रेमाचे ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे हित सर्वोच्च मानले पाहिजे
निवडणुकीच्या निमित्ताने बदललेल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना त्यांनी कारखान्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. कोण आपला आणि कोण परका, अशी विभागणी करण्यापेक्षा कारखान्याचे हित सर्वोच्च मानले पाहिजे. सभासदांनीही निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन कारखान्याच्या भवितव्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.