
पुण्यात गणेशाेत्सव निर्बंधमुक्त! प्रशासन सकारात्मक; पोलिस प्रशासनाला महापौरांची सूचना
पुणे : गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, तुम्ही कार्यकर्त्यांना साेबत घ्या असा सल्ला महापाैर मंजुषा नागपुरे यांनी पाेलिस प्रशासनाला दिला आहे. त्याचवेळी आगामी गणेशाेत्सव निर्बंधमुक्त करण्यासंदर्भातही प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. दरवर्षी प्रमाणे पुणे महापालिकेच्या वतीने गणेशाेत्सवाच्या तयारीसंदर्भात महापालिका भवनात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयाेजित केली हाेती.
या बैठकीला महापाैर नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशाेर राम, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरीक्त पाेलिस आयुक्त राजेश बनसाेडे, सह पाेलिस आयुक्त संजय दराडे आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. या बैठकीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परवानगी, स्पीकर , झाडांच्या फांदी छाटणी, वीज पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, विसर्जन मिरवणुक, गर्दीचे नियाेजन आदी विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मुद्दयांचा संदर्भ घेत, महापाैर नागपुरे यांनी गणेशाेेत्सव निर्बंधमुक्त करण्याविषयी स्पष्ट भुमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘ गणेशाेत्सवासाठी नियमावली निश्चितच असली पाहीजे, पंरतू निर्बंध असता कामा नये. तसेच यावेळी गणेशाेत्सवाचे ‘डिजीटल मॅपिंग’ केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने नाेंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक गणेश मंडळाची माहीती नागरीकांना सहज मिळणे शक्य हाेणार आहे. पाेलिस प्रशासनाने गणेश मंडळांनी केलेल्या तक्रारीनुसार गर्दीचे नियाेजन करणे आवश्यक आहे. ठराविक मंडळाकडे भाविक जाणार नाहीत अशा पद्धतीने नियाेजन न करता, सर्व भागात भाविक जाऊ शकतील असे नियाेजन करणे आवश्यक आहे.
पोलिसांकडून एक खिडकी योजना
सह पाेलिस आयुक्त दराडे यांनी यावर्षीचा गणेशाेत्सव हा बारा दिवसांचा असल्याचे नमूद करीत, गाैरी विसर्जन, ७ वा, ९ वा, ११ वा आणि अनंत चतुर्दशी) रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर, पारंपारीक वाद्य वाजविण्याची मुभा दिली असल्याची माहीती दिली. तसेच पाेलिसांकडून यावर्षी देखील परवानगीसाठी एक खिडकी याेजना राबविली जाणार आहे, असे सांगितले. तसेच ‘प्लाझ्मा, लेझर सारख्या घातक साहीत्याचा वापर करण्याच्या गणेश मंडळांच्या भुमिकेचेही त्यांनी स्वागत केले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गणेश मंडळांच्या समस्या साेडविण्यासाठी ‘नाेडल अधिकारी’नियुक्त करणार
महापालिकेच्या ठेवींचा गणेश मंडळांसाठी वापर करण्याची धीरज घाटे यांची सूचना
गणेश मुर्तीची उंची, आगमनाची वेळ, मार्ग याची माहीती संबंधित पोलिस ठाण्यास कळविण्याची सूचना
गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार
जाहीरातींवर काेणतेही शुल्क आकारले जाणार नाही
काेणत्याही स्टाॅलवर कारवाई केली जाणार नाही
ध्वनी प्रदुषणावरुन पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद