सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि हक्काची पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखालील पाठपुराव्याला यश आले असून, पोलीस मुख्यालयासाठी शासनाकडून ५० एकर (२० हेक्टर) जमीन मंजूर केली आहे. मावळ-मुळशी तालुक्यातील ताथवडे येथील ‘वाळुंजमाता क्षेत्र’ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत असलेली २० हेक्टर जागा पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर सुविधांसाठी हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. १३ ऑगस्ट रोजी ही जागा अधिकृतपणे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या स्वाधीन करण्यात आली.
२८ मे २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली होती. आणि १५ ऑगस्ट २०१८ पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, स्वतःची हक्काची इमारत नसल्याने गेल्या आठ वर्षांपासून आयुक्तालय भाड्याच्या जागेतूनच कार्यरत होते. या निर्णयामुळे गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्य सरकार, महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे) आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या समन्वयातून ही जागा मिळवणे शक्य झाले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वतंत्र पोलीस मुख्यालयासाठी जागेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला. ताथवडे येथील जागा प्रशासकीय तसेच दळणवळणाच्या दृष्टीने योग्य असल्याने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महसूल व वन विभागाच्या मंजुरीनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १३ ऑगस्ट रोजी ५० एकर जमीन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ताथवडे येथील विस्तीर्ण जागेत पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) कार्यालयासह शस्त्रागार, क्यूआरटी, बीडीडीएस, मोटार परिवहन विभाग आणि परेड ग्राऊंड उभारण्यात येणार आहे. तसेच पोलीस भरती मैदान, रनिंग ट्रॅक, क्रीडांगणे, इंटरनल शूटिंग रेंज आणि श्वान पथकासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याशिवाय पोलीस दवाखाना, पोलिसांच्या पाल्यांसाठी शाळा, बहुद्देशीय सभागृह तसेच अधिकारी आणि अंमलदारांसाठी निवास व्यवस्था उभारण्याचीही योजना आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध प्रशासकीय, प्रशिक्षण आणि कार्यात्मक गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या प्रक्रियेसाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
हे सुद्धा वाचा : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर

