
पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा धडाका; रस्ते, पदपथ, नाले अन् रुग्णालयांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात ही सभा झाली. चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा (एचव्हीएसी), ऑपरेशन थिएटर आणि विद्युत यंत्रणेची पुढील दोन वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) एक्स-रे विभागातील डिजिटल रेडिओग्राफी मशीनच्या हमी कालावधीनंतर देखभालीसाठी मूळ उत्पादक कंपनीसोबत करार करण्यासही मान्यता देण्यात आली.
रस्ते विकासाच्या कामांमध्ये रावेत येथील प्रभाग क्रमांक १६ मधील ताब्यात आलेले डीपी आणि बिगर डीपी रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती, प्रभाग क्रमांक २२ मधील पवनानगर व आदर्शनगर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण, तसेच प्रभाग क्रमांक ६, ८ आणि २० मधील विविध रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील सुदर्शननगर हेल्थ क्लबजवळील जुने सीडी वर्क पाडून नवीन बांधण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १५ मधील आकुर्डी गावठाण परिसरात पावसाळी पाणी वाहिन्या, पदपथ आणि अन्य स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदपथांची उभारणी, नेहरूनगर व विठ्ठलनगर परिसरातील स्थापत्यकामे, तर प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर येथे रोड फर्निचरची कामे केली जाणार आहेत. दिघी-बोपखेल, चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव आणि प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.
याशिवाय, दापोडी, निगडी आणि दिघी येथील पाच मुस्लिम व लिंगायत दफनभूमींच्या देखभालीसाठी संबंधित संस्थांना नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर व प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या निविदाही मंजूर करण्यात आल्या. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनास मुदतवाढ, तसेच प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ मधील वाहन, इंधन आणि चालकासह रिक्षा-टेम्पो व्यवस्थेच्या मुदतवाढीच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली.
नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार
सांगवी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी दृश्याधारित शिक्षण व व्हर्च्युअल प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करण्याच्या ई-लर्निंग मॉड्यूल खर्चाच्या प्रस्तावाचे अवलोकन करण्यात आले. महिला आयटीआय कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे आवश्यक साहित्य खरेदीच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. विविध प्रभागांतील रस्ते, नाले, सार्वजनिक सुविधा आणि आरोग्य यंत्रणांशी संबंधित कामांना मिळालेल्या या मंजुरीमुळे शहरातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
Ans: रस्त्यांचे डांबरीकरण, नाल्यांची दुरुस्ती, पदपथ, पावसाळी पाणी वाहिन्या, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि रुग्णालयांतील वैद्यकीय यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली.
Ans: चिंचवडच्या तालेरा रुग्णालयातील एचव्हीएसी, ऑपरेशन थिएटर व विद्युत यंत्रणेची दोन वर्षे देखभाल-दुरुस्ती आणि वायसीएम रुग्णालयातील डिजिटल रेडिओग्राफी मशीनच्या देखभालीला मान्यता मिळाली.
Ans: विविध प्रभागांतील रस्ते, नाले, पदपथ, स्वच्छतागृहे आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होऊन शहरातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.