सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंचर : गॅस टंचाईमुळे अनेक ढाबे व हॉटेल बंद असल्याने टोमॅटोची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, उत्पादकांना फटका बसत आहे. टोमॅटोला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, गॅस टंचाईमुळे अनेक ढाबे व हॉटेल बंद असल्याने टोमॅटोची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, उत्पादकांना फटका बसत आहे. बाजारात पुरवठा वाढला असला तरी मागणी कमी असल्यामुळे दरात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत असून शासनाने दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
“गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल काही दिवस बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी कमी झाली. टोमॅटोची मागणी घटल्याने बाजारभावही खाली आला, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. -डॉ.शांताराम महादेव गावडे,शेतकरी निरगुडसर.
याबाबत बोलताना लांडेवाडी येथील नवनाथ बाजीराव विश्वासराव म्हणाले, मी विश्वासराव मळ्यात साडे २२ गुंठ्यात ‘साहू’ जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. या शेतीतून साधारण शंभर ते सव्वाशे कॅरेट उत्पादन मिळत असून सध्या वीस किलो टोमॅटोला प्रतवारी नुसार १०० ते २२० रुपये दर मिळत आहे. टोमॅटो पिकासाठी मजुरी, रोप लागवड, काढणी, खत, औषधे आदींसाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र आतापर्यंत केवळ ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजूनही मुद्दल वसूल झालेले नाही.
टोमॅटो उत्पादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणात झाला, पण दर मिळत नाहीत. उत्पादन चांगले असूनही उत्पन्न कमी मिळत आहे. अजून अनेक शेतकऱ्यांची मुद्दलही निघाली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर शेती करणे अवघड होईल. -सुरेशराव टाव्हरे, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती निरगुडसर.
जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरीही संकटात
पुणे जिल्ह्यातील ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेला उन्हाळी कांदा आज शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला प्रतिकिलो अवघे ९ ते १२ रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.






