NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस प्रवासातील विविध सवलतींच्या डिजिटायझेशन प्रक्रियेचे करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासात पारदर्शकता आणण्यासह बनावट ओळखपत्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, तांत्रिक बाबींमुळे सध्या हजारो प्रवाशांना हे कार्ड काढण्यात अडचणी आहेत. हीच गरज लक्षात घेता आणखी मुदतवाढ दिली गेली आहे.
एसटी महामंडळाच्या बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. महामंडळाकडून विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध पुरस्कार विजेत्यांसह एकूण 35 प्रवर्गातील प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सवलतीचा लाभ पोहोचवण्यासाठी एनसीएमसी कार्ड फायद्याचे ठरेल.
दरम्यान, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, तांत्रिक बाबींमुळे सध्या हजारो प्रवाशांना हे कार्ड काढण्यात अडचणी आहेत. हीच गरज लक्षात घेता आणखी मुदतवाढ दिली गेली आहे. त्यानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या माध्यमातून सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करून प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.
100 रुपयांचा शिल्लक बॅलन्स ठेवणे अनिवार्य
कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा शिल्लक बॅलन्स ठेवणे अनिवार्य असून, त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील ईटीआयएम मशीन, महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप तसेच एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या सरल क्रमांकाशी, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांचे कार्ड आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांकाची जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे.






