
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेचा लवकरच होणार विस्तार; दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सेवेत?
पिंपरी : हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पुणेरी मेट्रो’च्या (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. या मार्गावरील बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके येत्या डिसेंबर महिन्यात प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ही स्थानके सुरू होणे हे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीवर आणि त्यानंतरच्या तांत्रिक पूर्ततेवर अवलंबून असणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या सीएमआरएस तपासणीपूर्वीचे अंतर्गत मूल्यमापन सुरू आहे. सीएमआरएसचे पथक याच आठवड्यात या मार्गाची पाहणी करणार आहे. मात्र, पाहणी झाल्यानंतर लगेचच सेवा सुरू होणार नाही. याची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान पथकाने काही त्रुटी नोंदवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित सवलतकारांना (कन्सेशनर) आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागू शकतो. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवाशांना या स्थानकांवरून प्रवास करता येईल.
जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित होणार
सध्या या २३.३ किलोमीटरच्या मार्गिकेवरील १७ स्थानके कार्यरत आहेत. बाणेरमधील ही दोन स्थानके सुरू झाल्यास कार्यरत स्थानकांची संख्या १९ वर पोहोचेल. या मार्गावरील उर्वरित चार स्थानके (पीएमआर-१३, पीएमआर-१४, पीएमआर-२० आणि पीएमआर-२२) टप्प्याटप्प्याने जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही सर्व २३ स्थानके सुरू झाल्यानंतरच प्रवाशांना पूर्ण क्षमतेने या मार्गाचा लाभ घेता येईल.
‘पार्किंग’ समस्येवर प्रशासनाचे लक्ष
मेट्रोचे टप्पे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली असून, त्यासोबतच स्थानकांजवळ वाहनतळांची (पार्किंग) मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या वाहनतळांची पुरेशी सोय नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला किंवा उन्नत मेट्रो मार्गाखालीच वाहने उभी करत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
FAQ
1. पुण्यातील कोणत्या मेट्रो मार्गिकेवरील दोन स्थानके सुरू होणार आहेत?
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणेरी मेट्रो मार्गिकेवरील दोन स्थानके सुरू होण्याची शक्यता आहे.
2. कोणती दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत?
बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके सुरू होण्याची शक्यता आहे.
3. दोन्ही मेट्रो स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे का?
होय. दोन्ही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतर्गत मूल्यमापन सुरू आहे.