
पुण्यातील पाणीपुरवठ्याचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांच्या 'कोर्टा'त; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
जलसंपदा विभागाने मात्र पुणे शहराच्या पाणी कोट्यात कपात केली असून, वर्षभरासाठी पुणे महापालिकेला अकरा टीएमसी इतकाच पाणीपुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पुढील वर्षी जुलै अखेरपर्यंत महापालिकेला केवळ सात टीएमसी इतकाच पाणी पुरवठा खडकवासला धरणसाखळीतून केला जाऊ शकतो. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाला आता एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर स्वंयसेवी संस्थांकडून पुण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील वस्तुस्थिती मांडली जात आहे. जलसंपदा विभागावर आरोप केले जात आहे. तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी आहे. पुणे शहराचा पाणी पुरवठा आठवड्यातून एकदा बंद ठेवावा किंवा एक दिवसाआड करावा, याबाबतचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार होता. पण अद्याप यावर निर्णय झाला नाही.
…म्हणून पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ
तसेच महापालिकेतील काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पुण्याच्या पाणी कोट्यात वाढ करून देण्याची मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाण्याचे नियोजनासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. शहराची वाढती हद्द आणि लोकसंख्येचा विचार करता वर्षाला सुमारे एकवीस टीएमसी इतकी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अकरा टीएमसी इतकेच पाणी मंजुर झाल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे.
प्रश्न १ : पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक कोण घेणार आहे?
उत्तर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याबाबत बैठक होणार आहे.
प्रश्न २ : पुणे महापालिकेला वर्षभरासाठी किती पाणी मिळणार आहे?
उत्तर : जलसंपदा विभागानुसार पुणे महापालिकेला वर्षभरासाठी ११ टीएमसी पाणी मिळणार आहे.
प्रश्न ३ : पुण्यात सध्या पाणी बचतीसाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे?
उत्तर : पुणे महापालिकेने गेल्या महिन्यापासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.