Chakan News: चाकणच्या वाहतूक कोंडीवर PMRDA ची मोठी कारवाई! संथ कामामुळे ठेकेदाराला ७५ लाखांचा दंड
‘चाकण डी-क्लॉगिंग’ प्रकल्पांतर्गत सुरू असलेली सातही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यातआला आहे. पण रस्त्यांच्या कामामुळे आधीच एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अपुरे मनुष्यबळ यांसारख्या कारणांमुळे रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे. मे. क्रिष्णाई इन्फ्रा. प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला कामाची गती वाढविण्याबाबत वारंवार सूचना देऊनही अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. परिणामी, वाहनांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करताना पोलिस प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली. कामाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी तसेच इतर नागरी समस्यांबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी, आणि स्थानिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होत होती. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण परिसराची पाहणी करत परिसरातील पायाभूत सुविधा आणि अन्य कामांसाठी ठराविक कालावधीत काम पूर्ण करण्याचे , तसेच कामांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिल्या.
त्यानुसार पीएमआरडीएकडून चाकण आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे, हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
Pune MLC Election 2026: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ कसा असतो? ५ जिल्हे, इतिहास आणि २०२६ च्या
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहा रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यापैकी दोन रस्त्यांसाठी सुमारे ७० टक्के ग्रामस्थांची संमती मिळाली आहे.
मात्र, उर्वरित प्रक्रिया पूर्ण करणे, संबंधित जमिनींचा प्रत्यक्ष ताबा घेणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
चाकणधील चार रस्त्यांची कामे अनेक कारणांमुळे रखडली आहेत. काही कामांच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. मेदनकरवाडीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामांच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. खराबवाडी रस्त्यांबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. तर नाणेकर वाडीचा मार्ग जोडण्यासाठी जो रस्ता प्रस्तावित आहे त्याची भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही. यासंदर्भात बोलताना पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी म्हणाले की, “चाकण शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत, कामाची वेळोवेळी पाहणीही केली जात असून अपेक्षित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय काही रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.”






