
Junnnar Ambegaon Haveli Mawal Mulshi Drought Situation
जिल्ह्यात यंदा पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अनेक महसूल मंडळांमध्ये सलग पावसाचा अभाव राहिल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागातील खरीप पिकांना या खंडाचा फटका बसत आहे.
Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा …
मुळशी, मावळ, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये एकाच तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत दिसून येत आहे. काही मंडळांमध्ये दीर्घ खंड असताना अन्य भागांत तुलनेने पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ तालुकानिहाय पर्जन्यमानाच्या सरासरीवरून परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करणे कठीण ठरत आहे.
पावसातील खंड वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी होणे, पिकांची वाढ मंदावणे आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर नसलेल्या तालुक्यांतील बाधित महसूल मंडळांची स्वतंत्रपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच …
पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष शेतीतील नुकसान याचा आढावा घेऊन प्रशासनाने बाधित भागांची नोंद घेण्याची मागणी होत आहे. दुष्काळाच्या निकषांत न बसणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात पावसाअभावी अडचणीत आलेल्या गावांनाही परिस्थितीनुसार मदत मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळाची सरकारी यादी वेगळी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती वेगळी, असे चित्र या पाच तालुक्यांतील अनेक महसूल मंडळांत निर्माण झाले असून, आगामी काळात पावसाचे पुनरागमन न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.