
माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन (Photo Credit - X)
माथेरानसाठी ५ वर्षांचा रोडमॅप – शंभूराज देसाई
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. “माथेरान शहराच्या विकासासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जाईल आणि त्यानुसार पुढील पाच वर्षे विकासाची गंगा आणली जाईल,” असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. या रोडमॅपवर दरवर्षी आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नियंत्रण समिती: देसाई यांनी संनियंत्रण समितीमध्ये स्थानिक नगराध्यक्ष आणि आमदाराचा समावेश असावा, असे मत व्यक्त केले.
पर्यटन स्थळ: माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवायचे आहे. वन विभागाने विकासकामांमध्ये सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
निवास व न्याहारी (B&B): ‘निवास आणि न्याहारी व्यवस्था’ (Bed and Breakfast) माथेरानमध्ये लागू करण्यासाठी निवडणुकीनंतर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ई-रिक्षा: पर्यावरणपूरक ई-रिक्षांमुळे स्थानिक घोडे मालकांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मिनी ट्रेनसाठी ₹१५० कोटींचा निधी – खासदार बारणे
खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरानसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वेळा भेट देणारा खासदार होण्याचा मान मला मिळाला आहे. मिनी ट्रेन बंद करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लोकसभेत आवाज उठविला आणि मिनी ट्रेन मार्ग अद्ययावत करण्यासाठी तब्बल ₹१५० कोटींचा निधी आणला. भुयारी गटार योजना आणि पर्यावरणपूरक ई-रिक्षांसाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी चंद्रकांत चौधरी यांना नगराध्यक्ष करण्याचे आवाहन केले.
‘औरंगजेब विचारांच्या हाती देऊ नका’ – आमदार थोरवे
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणातून युतीच्या उमेदवारासाठी जोरदार समर्थन केले. माथेरानच्या विकासासाठी गेल्या पाच-सहा वर्षांत प्रयत्न केले असून, ₹८८ कोटींचा विकास निधी आणला गेला आहे. माथेरानला ‘मॉडेल हिल स्टेशन’ बनवायचे आहे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. कर्जत तालुका औद्योगिक वसाहत नसलेला असल्याने, तो पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. फिनिक्युलर रेल्वे आणि रखडलेला रोप वे प्रकल्प आल्यास माथेरान पर्यटनाच्या बाबतीत आघाडीवर येईल, असे त्यांनी सांगितले.
धार्मिक आवाहन
“माथेरान हे हिंदुत्वाच्या विचारांचे असल्याने, माथेरान हे औरंगजेब विचारांच्या हाती देऊ नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. चौधरी कुटुंबाचे माथेरान शहरासाठी मोठे योगदान असून, चंद्रकांत चौधरी हे गोरगरिबांना मदत करणारे ‘दाता नेता’ आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही माथेरानमध्ये वेगाने विकास व्हावा यासाठी पर्यटन मंत्र्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज खेडकर यांनी केले, तर भाजप शहर चिटणीस राजेश चौधरी यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि लॉजिंग, घोडेवाले यांच्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.