सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : नमो पर्यटन सुविधा केंद्र ही राज्याच्या पर्यटनाला बूस्टर देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या योजनेवर राजकीय हेतूने टीका करत आहेत. मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नमो पर्यटन योजनेच्या संदर्भात राज्य शासनाने काढलेल्या जीआरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका करत ऐतिहासिक गडांच्या पायथ्या जवळील नमो केंद्र फोडण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, राज ठाकरे यांनी नमो योजनेची पूर्णता माहिती घ्यावी. जे सत्तेत नाहीत असे विरोधक राजकीय हेतूनेच या योजनेवर टीका करत आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप समोर किती लाचारी करावी, अशी टीका केली होती. या टिकेचा देसाई यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या वरिष्ठांच्या समन्वयाने काम करताना नेतृत्व मान्य केले, हा शिंदे यांच्या मनाचा मोठेपणा आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही, अशी विरोधकांनी हाळी उठवली होती, मात्र ही योजना महायुतीने यशस्वी करून दाखवली.
अतिवृष्टी राज्यात झाल्याने खरीप हंगामाचा सुद्धा पेरा वाया गेला आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्यांचे पंचनामे सदोष झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला गेला आहे, या विषयावर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, राज्य शासनाने एक उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही ते पंचनामे सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेऊन त्या संदर्भातील विषय कॅबिनेटसमोर आणून त्याला मंजुरी घेतली जाईल, पालकमंत्री देसाई म्हणाले. यासंदर्भात मी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनी राज्यातील पंधराशे कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान निश्चितच पोहोचवले जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
तोडफोडीची भाषा अत्यंत दुर्दैवी
पालकमंत्री देसाई म्हणाले, काँग्रेसने छत्रपती शिवरायांचा उपमर्द केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यातील छत्रपतीच्या वारसदारांना ते छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे मागितले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी कोणतीही विरोधात भूमिका घेतली नाही. आत्ताच नरेंद्र मोदी पर्यटन सुविधा केंद्रावर त्यांनी टीका करायचे कारणच काय. नमो पर्यटन केंद्र म्हणजे प्रत्येक गडाच्या पायथ्याला पुरुष व महिलांसाठी विश्रांती कक्ष बांधली जाणार आहेत. यामध्ये दिव्यांग बांधवांना सुद्धा विशेष सोय केली जाणार आहे. पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांवर सुविधा मिळत नाहीत हे डोळ्यासमोर ठेवूनच या योजनेची आखणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची तोडफोडीची भाषा अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य शासन सुद्धा या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल, असा इशारा त्यांनी दिला.
महायुतीचा झेंडा निश्चित फडकणार
जे राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून स्तुती करत होते, तेच राज ठाकरे आज महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नमो योजनेवर टीका करत आहेत. हा राजकीय दांभिकपणा मुंबईकर जनता पाहून आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेचा मलिद्याचा राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच एकत्र आले आहेत. मात्र मुंबईची जनता अत्यंत सुज्ञ आहे. त्यांचा हा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा निश्चित फडकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला






