कर्जत /संतोष पेरणे : मध्य रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात नव्याने अनेक विकास कामे सुरु आहेत. त्यात फलाट रुंदीकरण करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. फलाट क्रमांक एकची आता ३० फूट रुंदीकरण करण्याचं योजिलं आहे . त्यामुळे प्रवाश्यांना उभं राहण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होणार आहे. फलाटाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नेरळ स्थानकात आता मोठ्या प्रमाणात जागा उपल्बध होणार आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात विकास कामं सुरु असून त्यात पादचारी पूल,सरकता जिना, उद्ववाहन,तसेच प्रवाशांसाठी निवारा शेड आदी कामे सुरु आहेत. आता मुंबई येथून कर्जत कडे जाणारी उपनगरीय लोकल यांचा फलाट अधिक रुंद बनविला जात आहे. सध्या नेरळ स्थानकातील फलाट हा २२ फूट रुंदीचा असून नव्याने रुंदीकरण करण्यात आल्यावर हा फलाट तब्बल ३० फूट रुंदीचा होणार आहे. रुंदीकरण कामे करण्यापूर्वी मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून रुंदीकरण भागात संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.उपनगरीय लोकल मधून उतरल्यावर कोणत्याही प्रवाशाने बाहेर पडताना ठराविक ठिकाणीच मार्ग असावेत यासाठी भिंत बांधण्यात येत आहे.त्यामुळे कोणातही प्रवासी हा उपनगरीय लोकल मधून उतरल्यावर उड्या मारून स्थानकाच्या बाहेर जाऊ शकत नाही.
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात माथेरान येथे जाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. ते प्रवासी मुंबई भागातून येताना फलाट एक वर उतरतात.त्या प्रवाशांना आता फलाटाची रुंदी वाढवल्याने फायद्याचे ठरणार आहे. नेरळ स्थानकात फलाट रुंदीकरणाच्या कामाला गती आल्याने पावसाळ्यापूर्वी नेरळ स्थानकातील फलाट एक रुंद आणि बंदिस्त होणार आहे. याचा फायदा प्रवासी वर्गाला होणार आहे.
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी विकास कामं केली जात आहेत. त्यात तिसरी मार्गिका करण्याचे महत्वाचे काम आहे . या मार्गिकेमध्ये तिकीट बुकिंग कार्यालय महत्वाचा अडथळा ठरत होते. त्यामुळे फलाट दोनच्या बाहेर आधी नवीन इमारत बांधण्यात आली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या तळमजल्यावर संगणकीय आरक्षण केंद्र आणि उपनगरीय लोकल यांच्या तिकीट खिडक्या आहेत.त्यात उपनगरीय तिकीटसाठी चार तिकीट खिडक्या आणि संगणकीय आरक्षण करणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी दोन तिकीट खिडक्या उभारण्यात आल्या आहेत.