कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बाजारपेठ आणि नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.त्यात माथेरानचे डोंगरातून वाहणारे पाणी नेरळ गावातून दोन मोठ्या नाल्यांमधून उल्हास नदीकडे वाहत जात असते.त्या नाल्यांतुन पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचा जोर मोठा असतो. त्यामुळे नेरळ गावातून वाहणाऱ्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता असते.मात्र काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना नेरळ ग्रामपंचायतीने नालेसफाई यांची कामे हाती घेतली नाहीत.दरम्यान, नालेसफाई केली नसल्याने नाले आणि गटारे यांच्यात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायत हि रेल्वे स्थानक असलेले गाव असून या गावाच्या मागे असलेल्या माथेरान डोंगरातून वाहनारे पाणी हे नेरळ गावातून जात असते. नेरळ गावातील दोन भागातून हे नाले वाहत असतात आणि त्या नाले ग्रामपंचायत प्रशासनाकडून साफसफाई करण्याची कामे केली जातात. मात्र यावर्षी काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असतांना नेरळ गावातील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही.त्याचा थेट परिणाम नेरळ ग्रामपंचायत मधील नाले तुडुंब भरून वाहणार आहेत.नाल्यांची सफाई करण्याची कामे नेरळ ग्राम,पंचायत करणार की नाही याची देखील माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे नेरळ गावातील नाले पावसाच्या वेळी भरून वाहून नागरी वस्तीत घुसून नुकसान करण्याची शक्यता आहे.
नेरळ गावात माथेरान डोंगरातून येणारे पावसाचे पाणी हे टपालवाडी भागातून पायरमाळ येथून हा नाला ब्रिटिशकालीन धरण असा पुढे पोलीस स्टेशन भागातून नेरळ रेल्वे स्टेशन परिसरात हा नाला वाहत जातो. तर दुसरा मोठा नाला हा कोंबलवाडी येथून नाला कोतवाल वाडी खांडा असा नेरळ स्टेशन येथे जाऊन उल्हास नदीला जाऊन या नाल्याचे पाणी भेटते.तर माणगाव टेकडी येथून येणारे पावसाचे पाणी हे पाडा भागातून मातोश्रीनागर गंगाननगर,निर्माणनगरी आणि साईकृपा सोसायटी असा एसटी स्टॅन्ड भागातून उल्हास नदीकडे जात असतो.या तिन्ही नाल्यांची साफसफाई दरवर्षी नेरळ ग्रामपंचायत करीत असते. यावर्षी मे महिना संपायला आला तरी नेरळ ग्रामपंचायत कडून तिन्ही मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील तिन्ही प्रमुख नाले यांची लांबी साधारण आठ किलोमीटर लांबीचे असून त्या नाल्यांची साफसफाई काही दिवसांवर पाऊस आला असताना झालेली नाही. त्याचवेळी नेरळ गावातील रस्त्याच्या बाजूने वाहणारी गटारे यांची देखील साफसफाई झालेली नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे धोरण काय? हे देखील ठरलेले दिसत नाही.ग्रामपंचायतीवर प्रशासकीस राजवट असताना प्रशासक दहा दहा दिवस ग्रामपंचायत कार्यालयात येत नाहीत आणि त्यामुळे विकास कामे खोळंबून राहिली आहेत.
राम हिसालके, सामाजिक कार्यकर्ते
नेरळ गावात पूर्वी मे महिना सुरु झाला कि नाल्यांची आणि गटारे साफ करण्याची कामे सुरु व्हायची. मात्र यावर्षी अद्याप गटारे साफ करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही.त्यामुळे गटारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहणार आहेत. त्याचवेळी गटाराचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे.मोठ्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य मंडळ नसल्याने काय काय होऊ शकते हे सध्याच्या प्रशासकीस राजवट पाहिल्यावर प्राधान्याने दिसून येत आहे.मात्र या कामाचे ग्रामपंचायत प्रशासनाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.