Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार
खालापूर तालुक्यातील गोदरेज कंपनीमध्ये स्थानिक ठेकेदारांचा मोठा सहभाग असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर कर्जत परिवर्तन आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने कामगारांच्या आणि स्थानिक ठेकेदार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे. त्यानंतर गोदरेज कंपनी असलेल्या तांबाटी आणि वडवळ या ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यात महत्वाची बाब पुढे आली असून शिवसेना ठाकरे पक्षाचे खालापूर प्रमुख यांची ग्रामस्थांसोबत उपस्थिती होती.
कर्जत आणि खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप विरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला एकत्र घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरुद्ध आव्हान उभे केले. हे मागील वर्षभर सुरु होते, परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खालापूर तालुक्यातील गोदरेज कंपनीच्या विरुद्ध आंदोलनाची भाषा जाहीर करण्यात आली. त्यानंतर कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राजकारण पेटले आहे.
खालापूर तालुक्यात असलेल्या गोदरेज कंपनीमध्ये कर्जत आणि खालापूर तालुक्यातील अनेक तरुण नोकरीला आहेत. त्यातही बहुसंख्य ठेकेदार हे मराठी आहेत. असे असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांच्या भूमिकेने शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी २१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक कामगारांच्या हितासाठी आपण स्थानिकांच्या बरोबर आहोत, असे जाहिर केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कामगार वर्गाला साथ देतानाच कंपनी विरुद्ध कोणी काही करणार असेल तर त्यावेळी स्थानिकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असे म्हणत सावंत यांनी जाहीर पाठिंब्याची घोषणा केली आहे.
त्यानांतर गोदरेज कंपनी परिसरातील ग्रामस्थांना शिवसेना ठाकरे गट यांच्या बद्दल आपुलकी वाटू लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाबरोबर उभे राहण्याचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. कंपनी परिसरातील तांबाटी आणि वडवळ ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पाठीशी केवळ उभे राहण्याचा निर्णय घेतला नाही, तर या दोन्ही ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी कर्जत येथे येऊन नितीन सावंत यांचे आभार मानले. यात दोन्ही ग्रामपंचायत मधील अनेक ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते. त्यात शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख देखील कामगारांच्या हितासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख यांच्या भेटीला आले होते.






