उल्हासनदीवर पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; पुलाच्या दुरावस्थेबाबत कधी सुटणार प्रश्न ?
कर्जत/ संतोष पेरणे : दर पावसाळ्यात पुलावरुन पाणी जात असल्याने रोजच्या या त्रासाला गावकरी कंटाळले आहेत. मागच्या वर्षी पुराच्या पाण्याने लोखंडी रेलिंग वाहून गेला तेव्हापासून उल्हास नदीवर बांधलेला पुल प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली गेली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात देखील नदीपरिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांचे अनोनात हाल होतील, अशी भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बेंडसे आणि वावे या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दर पावसाळ्यात पुराची पाणी जात असतं. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्यानंतर पुलावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले आहेत.त्या लोखंडी रेलिंग बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, बांधकाम विभाग बेडसे वावे पुलाला लोखंडी रेलिंग बसवून घेणार आहे कि नाही? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहे.
वावळोली ग्रामपंचायत बेंडसे आणि उमरोली ग्रामपंचायत मधील वावे या दोन गावांना जोडणारा पूल 2020मध्ये उल्हास नदीवर बांधण्यात आला. त्यापूर्वी या भागातील लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एकतर कर्जत येथून किंवा भिवपुरी चिंचवली येथून जावे लागत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने वावे आणि बेंडसे या गावांना जोडणारा पूल बांधला त्यामुळे गावकऱ्यांना हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्या पुलावरून महापुराची पाणी जाऊन स्थानिकांच्या घरात शिरत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सातत्याने होत आहे.यावर्षी त्या पुलाला लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग तुटून गेले असून ते लोखंडी रेलिंग पुन्हा लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मागील तीन महिन्यात करू शकले नाही.
बांधकाम खात्याला त्या पुलाचे लोखंडी रेलोइंग महापुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत याची माहिती आहे की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. याचे कारण म्हणजे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बेंडसे वावे या पुलाचे पावसाळयात महापुराच्या पाण्याने नुकसान झाले. या सगळ्याची माहिती घ्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी आले नाहीत. पावसाळ्यात पुलाच्या वाहून गेलेल्या लोखंडी रेलिंगबद्दल बांधकाम खात्याने कोणतीही कार्यवाही केली नाही. अशी स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग बेंडसे वावे पुलाची दुरुस्ती करणार आहे काय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.