
Raigad News: लाखों रुपये खर्चून उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद! खोपोलीत नेमकं चाललंय काय?
शहरातील कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्याची समस्या कमी व्हावी, या उद्देशाने ही यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र, प्रकल्पस्थळी असलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असून परिसरात धूळ आणि अस्वच्छता दिसून येत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खरेदी केलेली यंत्रेच वापराविना पडून असतील, तर या प्रकल्पाचा मूळ उद्देश साध्य कसा होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने नेमका किती निधी खर्च केला? यंत्रसामग्री कोणत्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली? खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली का? तसेच यंत्रणेची क्षमता किती असून ती प्रत्यक्षात किती दिवस चालविण्यात आली? असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत, यंत्रणा बंद पडण्यामागचे नेमके कारण काय, तांत्रिक अडचणी आहेत की देखभाल-दुरुस्तीअभावी हा प्रकल्प बंद आहे, याची माहितीही प्रशासनाने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
एकीकडे शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाटीचा प्रश्न कायम असताना दुसरीकडे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खरेदी केलेली लाखो रुपयांची यंत्रसामग्री वापराविना पडून आहे. त्यामुळे सार्वजनिक पैशातून उभारलेल्या या प्रकल्पाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.