
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार? रस्त्यांच्या प्रश्नावर व्यावसायिकांचे आंदोलन
माथेरान: माथेरान मध्ये रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावले जात आहेत. याविरुद्ध माथेरान शहरातील आश्वपाल संघटना आक्रमक झाली असून त्यांनी सोमवार पासून व्यवसाय बंद आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे सोमवार पासून एकही घोडा माथेरानच्या रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी आलेला नाही.मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर सर्व आश्वपालक यांनी येथील श्रीराम चौकात उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, याच विषयावर दुसऱ्यांदा घोडे व्यवसाय बंद आंदोलन होत असून पालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
माथेरानमधील अश्वपालक यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही.त्यामुळे सोमवार पासून स्थानिक अश्वपाल संघटना आणि मूलवासी अश्वपाल संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार २६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या घोडे बंद आंदोलनानंतर गुरुवार दि. २९ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले.येथील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केले असून आश्वपाल संघटनेच्या नेत्या आशा कदम यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झाले आहे.रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट क्ले पेव्हर ब्लॉक, मोडकळीस आलेले घोडा स्टँड, हेरिटेज बंगल्यांच्या कामांना दिलेल्या परवानग्या आणि ई रिक्षांच्या प्रश्नांवर प्रशासनाने निर्णय न घेतल्याने संघटना आक्रमक झाली आहे.
Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप
श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खंडाळा पॉईंट रोडपर्यंत सुरू असलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या दर्जावर संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामाची गुणवत्ता तपासून निकृष्ट काम तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शार्लोट लेकच्या संवर्धन कामातून काढलेले दगड आणि माती रस्त्यांच्या आणि इतर कामांसाठी वापरण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या साहित्याचा वापर कुठे झाला, याची माहिती देऊन संपूर्ण हिशेब सार्वजनिक करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ई रिक्षा सुरू झाल्या आहेत.मग मंजुरी २० ई रिक्षा साठी असताना त्या ऐवजी त्या २६ ई रिक्षा कशा झाल्या आणि हातरिक्षा चालकांच्या मागण्यांवर निर्णय का झाला नाही, असे सवाल अश्वपाल संघटनेने उपस्थित केले आहेत. हेरिटेज बंगल्यांच्या कामांना दिलेल्या परवानग्या आणि मोडकळीस आलेल्या घोडा स्टँडच्या दुरुस्तीबाबतही उत्तरे मागण्यात आली आहेत. अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील अश्वचालकांचे प्रश्न सुटत नसल्याची नाराजी व्यक्त केली. त्यामुळे घोडे बंद आंदोलनानंतर आज पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. माथेरानमधील अश्वचालकांच्या मागण्यांवर प्रशासन ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर