रायगड / मुंबई : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. परशुराम घाट असो किंवा अन्य इतर ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. मुंबई गोवा अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाला.
या अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला आहे. या अपघातात ट्रकच्या चालकाकडील बाजूचा भाग आत मध्ये ठोकला गेला, त्यामुळे चालकाचा पाय त्यामध्ये अडकला होता. ताबडतोब स्थानिकांच्या मदतीने ठोकलेल्या एसटीला लोखंडी साखळदंड लावून ट्रकचा आतमध्ये घुसलेला भाग खेचण्यात आला आणि ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसमधील प्रवाशांना सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र ट्रक गंभीर धडक बसल्यामुळे ट्रकचा चेंदामेंदा झाला आहे. यात ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय तुटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सध्य़ा या ट्रकचालकावर उपचार सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वीच परशुराम घाटात दरड कोसळली होती. पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला असल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यावर ताप्तुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पुर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्याशिवाय गॅबीयन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लास्टीकचे अच्छादन केले आहे. परंतू वाढत्या पावसामुळे दुरूस्तीच्या उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण झाला होता. पावसाचा जोर कमी होताच दुरूस्तीला चालना मिळणार आहे, असं सांगण्यात आलं होतं.
परशुराम घाटातील चौपदरकीरण या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरवातीला कुळ, खोत व देवस्थानच्या मोबदल्यावरून परशुराम नेहमी चर्चेत राहिला. त्यानंतर परशुराम घाटाच्या डोंगर माथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीचा सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला. परंतू आता हे सर्व बाजूला राहिले असून परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतला आहे.
पावसाळ्यापुर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कॉक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच काही महिंन्यापुर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची सरंक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबीयन वॉल उभारली जात होती. तसेच पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबूतीकरण केले जात होते. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि महामार्गावरील रस्त्यांची दुर्दशा या समस्य़ांना वाहन चालक तोंड देत जीव मुठीत घेत प्रवास करत आहेत.