विजय मोकल : शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत. २४ गाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशिनाथ पाटील, राजन झेमसे, वाशी सरपंच संदेश ठाकूर, माजी सरपंच गोरख पाटील, मेघा म्हात्रे, नरेश मोकल, प्रकाश ठाकूर, अनंत पाटील, हेमंत पाटील, आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावे लागले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी खासदार धैर्यशील पाटील, पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार, गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ज्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा, मागील मिटिंगच्या प्रोसिडिंग व इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले. त्यानंतर गेल कंपनीच्या अधिकारी यांनी पोलीस फौजफाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते.
मात्र समुद्र आणि खाडीकिनारी जागेतून पाईप लाईन टाकण्यात यावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या प्रमाणे लाईन आऊट करा. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही असं आलेल्या अधिकारी वर्गाला ठणकावून सांगण्यात आले. शेतकऱ्यांची आक्रमकता व रुद्रावतार पाहून संबंधित अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतले. पेणच्या शेतकरी वर्गाचा गेल इंडियाच्या वायू वाहिनीला तीव्र विरोध असताना देखील यामधे शेतकरी आणि गेल इंडीया वायू वाहिनी अधिकारी यामधे समन्वय साधावा या हेतूने पेण प्रांत कार्यालयात पेणमधील प्रकल्पबाधित शेतकरीवर्गाची बैठक मागील वर्षात डिसेंबरमध्ये संयुक्त बैैठक झाली होती.
अधिकाऱ्यांना समजूतीचे बोल व गॅस पाईप लाईन खाडीकिनारी जागेतून न्यावी असे शेतकऱ्यांचे ठाम मत शेवटपर्यंत आहे. प्रकल्पासाठी खाडीकिनारी लगत जागेची पहाणी करुन लाईन आऊट करा, अन्यथा गेल इंडिया गॅस वाहिनी प्रकल्पाला कायम विरोध राहणार असे बैठकीत शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी उपोषणा दरम्यान खासदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार व शेतकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे ठरले त्याला गेलचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.