
Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी
रायगड जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा लाभला असून मुरुड, काशिद, दिवेआगर यांसह अनेक समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्रमाणात कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या दिसत नसल्याचा दावा पंडित पाटील यांनी केला.
‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
समुद्रकिनाऱ्यांवर धोकादायक ठिकाणांची स्पष्ट माहिती देणारे फलक, प्रशिक्षित जीवरक्षक, पोलिस बंदोबस्त, बचाव उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. अलीकडील दिवेआगर दुर्घटनेनंतरही समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेवर याच मुद्द्यांवरून चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काशिद समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वी बचावासाठी रोबोटिक बुईचा वापर करून पर्यटकांचे प्राण वाचविण्यात आले होते. त्यामुळे आधुनिक बचाव उपकरणांचा वापर इतर संवेदनशील समुद्रकिनाऱ्यांवरही वाढविण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित होते.
राज्य सरकारने रायगडच्या समुद्रकिनाऱ्याऱ्यांसाठी स्वतंत्र, कायमस्वरूपी आणि एकसंघ सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. या प्रश्नावर आपण शासनाकडे अधिकृत पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले. दरम्यान, दिवेआगर दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक वाढविण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिस यांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
२०१७-१८ च्या सुमारास मुरुड येथे पुण्यातील पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भदेताना त्यांनी सांगितले की, त्या दुर्घटनेनंतर काही उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्या पुरेशा आणि कायमस्वरूपी स्वरूपाच्या नसल्याचे त्यांनी म्हटले. केवळ एखादा वॉचटॉवर उभारणे किवा दुर्घटनेनंतर बचावकार्य करणे हा पर्यटकांच्या सुरक्षेचा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटना घडू नयेत यासाठी आधीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका पडित पाटील यानी मांडली.