
Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू
आता ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हाभर मोफत आरोग्य शिबिरांची मोहीम सुरू राहणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य शिबिरात जाऊन विविध आजारांची तपासणी करून वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या घराजवळच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्या घराजवळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी शिबिरांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
दवाखाने आणि शहरी आरोग्य व वेलनेस केंद्रांमध्ये दैनंदिन तपासणी शिबिरे, प्रत्येक उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक आरोग्य शिबिर आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन विशेष आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
‘श्री गणेशा अभियान २.० ‘अंतर्गत तपासणी झालेल्या ५४ हजार १५२ नागरिकांमध्ये २५ हजार ४९४ पुरुष, २४ हजार २९० महिला आणि ४ हजार ५९६ बालकांचा समावेश आहे. अभियानात विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये जनरल मेडिसिनवी २४ हजार ८१५, नेत्ररोगाची १ हजार ६३३, अस्थिरोगाची १ हजार ३१७, स्त्रीरोगाची १ हजार ८२, शल्यचिकित्सेची ९५९, त्वचारोगाची ८६८, हृदयरोगाची ७५२, बालरोगाची ५८५ आणि कान-नाक-घसा विभागाची ३९२ तपासणी करण्यात आली.
हृदयविकाराचे वेळेत निदान व्हावे यासाठी ७ हजार ४२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या ४६२ गंभीर रुग्णांना अँजिओग्राफी व पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले.
Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजाराची लक्षणे वेळेत लक्षात न आल्यास उपचार गुंतागुंतीचे होऊ शकतात. जिल्हा परिषदेने गावपातळीपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तपासणी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने नजीकच्या ग्रामपंचायत, उपकेंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिराला भेट देऊन स्वतःची व कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. – नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड