राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे
विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
मराठवाड्यात हवामान राहिले कोरडे
पुणे: राज्यातील नैऋत्य मोसमी पाऊस ओडिशा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागातून तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागातून माघारी परतला आहे. त्यामुळे राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे झुकत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहिले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी किंचित वाढ नोंदवली गेली. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. किमान तापमानात कोकणात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ झाली असून विदर्भात किंचित वाढ झाली आहे.
पुढील तीन दिवस राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Rain: यंदाचा पाऊस ठरला अनोखा! एक महिना आधी आगमन अन्…; सविस्तर वाचा
शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस निरभ्र वातावरण कायम राहील, मात्र दुपारी किंवा संध्याकाळी अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मोसमी पावसाचा शेवटचा टप्पा सुरू असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने हिवाळ्याच्या आगमनापूर्वी उष्णतेचा अनुभव नागरिकांना जाणवणार आहे.
Maharashtra Rain: ‘मूडी वरुणराजा’! पावसाचा बदलता पॅटर्न; अतिवृष्टीच्या घटनांमध्ये…
यंदाचा पाऊस ठरला अनोखा
यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले. ७ जूनऐवजी ७ मेपासूनच तो धो-धो कोसळू लागला. त्यामुळे पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले. जवळपास पाच महिने चाललेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती नियोजन विस्कळीत झाले. पावसाच्या दीर्घ सत्रामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसला.
यावर्षी इतका पाऊस का पडला?
यामागचे मुख्य कारण हवामान बदल आणि समुद्र तापमानातील चढ-उतार हे आहे. समुद्राचे वाढते तापमान हवेत अधिक बाष्प साठवते, परिणामी कमी वेळेत प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी राज्याला हवामान बदलाचा थेट फटका बसलेला स्पष्ट दिसतो. जागतिक तापमानवाढ आणि मानवनिर्मित हवामान बदल यांनी पावसाचे गणित बदलले आहे. अल-निनो आणि भारतीय महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल) यांसारख्या नैसर्गिक चक्रांमुळे पावसाचे प्रमाण बदलते, परंतु मानवी कारणांमुळे ही चक्रेही असंतुलित झाली आहेत.