पंढरपूर : राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. माढा तालुक्यातील उंदरगाव परिसरास रात्री पावसाने झोडपून काढले. या परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. हजारो एकर पिकात पाणी साठून राहिले आहे. या परिस्थितीची पाहणी आमदार अभिजित पाटील यांनी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार गटविकास अधिकारी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी सोबत होते.
अहवाल पाठवण्याच्या सूचना
आमदार पाटील यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस, डाळिंब, बोर, मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. आमदार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या.
शेतकऱ्यांच्या घरात घुसले पाणी
आमदार पाटील यांच्या गाड्यांचा ताफा जसा जसा पुढे जात होता, तसे तसे शेतकरी रस्त्यावर येऊन उभे राहत होते. शेत पिकांचे झालेले नुकसान दाखवत होते. ओढ्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांत साठले होते. या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार पाटील यांनी केली. उंदरगाव येथील काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसले होते, याबाबत तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
हे सुद्धा वाचा : पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्यावरुन काँग्रेस आक्रमक; बड्या नेत्याने भाजपला दिला इशारा
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश
मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी उद्या पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहाणी करा, असे सांगितले आहे.