सौजन्य - नवराष्ट्र टीम
डोंबिवली : काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना महागात पडली आहे. या कारणावरुन संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात साडी नेसविली. या घटनेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. ही घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इशारा दिला आहे.
हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
डोंबिवलीतील एका ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. तुमच्या जातीचे लोक माजलेत, असे म्हणत धमक्या दिल्या. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. भाजपाच्या या गुंडांवर खून, बलात्कारासारख्या २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने असे विकृत, गुंड, मवाली लोक पाळले आहेत, त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा काँग्रेस त्यांना धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
प्रकाश पगारे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. शिवाय ते ज्येष्ठ नागरीक आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात एक पोस्ट सोशल मिडियावर टाकली होती. या पोस्टने भाजपने जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि संदीप माळी हे संतप्त झाले. त्यांनी पगारे यांना फोन करुन बोलालून घेतले. त्यानंतर पगारे यांना डोंबिवलीत भर रस्त्यावर साडी नेसवण्यात आली. साडी नेसवतानाचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे.
प्रकाश पगारे नेमकं काय म्हणाले?
पगारे यांनी सांगितले की, मला सुरेश पाटील या नावाने फोन आला होता. मात्र माझ्या फोनवर कोणाचा फोन आहे हे ओळता येतं. त्यानुसार तो फोन संदीप माळी याचा होता. त्याचं नाव ही आलं होतं. त्याला विचारले तू सुरेश पाटील नाव का सांगतो. त्यावर त्याने त्याच्या नावाने फोन रजिस्टर असल्याचे सांगितले. शिवाय एक मिटींग आहे त्यासाठी या असं सांगण्यात आलं. पण आपण प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपल्याला परत फोन करण्यात आला. त्यावेळी आपण डोळे तपासण्यासाठी रुग्णालयात निघालो होतो. त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेरच नंदू परब आणि संदीप माळी हे त्यांच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यांनी मी केलेली पोस्ट मला दाखवली. त्यानंतर त्या सर्वांनी आपल्याला शिवीगाळ केली. जातीवाचक शब्द वापरले. शिवाय आपल्याला जबरदस्तीने साडी नेसवली. पण मी टाकलेल्या पोस्टशी आपण ठाम असल्याचं या सर्वांना ठणकावून सांगितल्याचं ते म्हणाले. तुम्हाला पोस्ट वाईट वाटत असेल तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करा असं आव्हानही दिल्याचं पगारे म्हणाले. संदीप माळी याच्या विरोधात 22 गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार आहे. तर नंदू परब डोंबिवलीतल्या बेकायदा इमारतीच्या घोटाळ्यात आहे असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान ज्या पोस्टवरून हा वाद झाला ही पोस्ट पगारे यांची नाही तर ती त्यांनी फॉर्वर्ड केल्याचे त्यांनी सांगितले.