मुंबई: त्रिभाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर आले. ५ जुलैला वरळीतील एनएससीआय डोम येथे झालेल्या ऐतिहासिक मेळाव्यात दोघेही उपस्थित होते. “एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असे ठाम विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. पण राज ठाकरे यांनी मात्र युतीबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिले नाही.
या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. अशातच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “युतीविषयी कोणीही खुली चर्चा करू नये, कोणत्याही वक्तव्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी,” असे आदेश त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या
या सूचनेमुळे मनसे-शिवसेना युतीच्या शक्यतेवर अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची तयारी दिसत असतानाच, दुसरीकडे युतीबाबत राज ठाकरेंनी घेतलेली सावध भूमिका राजकीय संकेत देणारी मानली जात आहे.
वरळीतील NSCI डोममध्ये झालेल्या भव्य संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – तब्बल २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना युतीविषयी कोणतीही सार्वजनिक वक्तव्ये टाळण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. “युतीबाबत बोलायचे असल्यास, माझी परवानगी आवश्यक आहे,” अशी सूचनाही त्यांनी दिली. त्यामुळे युतीबाबत निर्माण झालेल्या चर्चांना सध्या विराम मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्याची तीव्र इच्छा असल्याचे संकेत विजय मेळाव्यातील त्यांच्या भाषणातून तीन ते चार वेळा स्पष्टपणे उमटले. मात्र, राज ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावर संयमित आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी युतीबाबत थेट कोणतेही भाष्य टाळले.
सध्या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये युतीसंबंधी उत्सुकता असून, पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे,” अशा भावनिक शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून आवाहन केलं. मात्र, आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती प्रत्यक्षात येईल का, याबाबत त्यांनी कोणताही स्पष्ट संकेत दिले नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात युतीसाठी हात पुढे केल्याचे स्पष्टपणे जाणवत असतानाही, राज ठाकरे यांनी मात्र संयमित आणि मोजक्या शब्दांत भूमिका मांडली. त्यामुळे भविष्यात युती होईल का, हे अद्यापही अनिश्चितच आहे. राज ठाकरे यांची भूमिका युतीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून २० वर्षांनी एकत्र आलेले ठाकरे बंधू, राजकीय एकत्रित वाटचाल करतील की नाही, याकडे राज्याचे आणि मराठी मतदारांचे लक्ष लागले आहे.