
Balasaheb Thackeray 100 th Birth Anniversary
२००५ साली मी पक्ष सोडला आणि साल २००६…जानेवारी महिन्यात मी राज्यव्यापी दौन्यावर निघालो प्रवासात असताना मोबाईल वाजला… मी फोन घेतला, पलीकडून आवाज आला, ‘बरा आहेस ना रे…?’ बाळासाहेब काळजीच्या स्वरात विचारत होते. मी हो म्हटलं. ‘कुठे लागलं नाही ना?’ लगेच पुढचा प्रश्न आला. खरं तर, आमच्या गाडीला ट्रकची धडक बसणार होती, पण तसं झालं नाही. आम्ही बचावलो, सुखरूप होतो, पण बातमी ‘मातोश्री’ पर्यंत गेली होती. म्हणूनच काकाच्या आवाजात काळजी होती.
मी लहान असताना उकळतं पाणी अंगावर पडून भाजलो होतो ते दिवस आठवतात. मी तेव्हा ‘मातोश्री’वरच राहायला होतो. औषधं सुरू होती. मानेवर, पाठीवर फोड आले होते. तेव्हा रोज सकाळी बादलीभर पाणी, कापूस, डेटॉल घेऊन काका माझ्याबरोबर बसायचा. जखमा डेटॉलने धुऊन काढायचा. दोन महिने अशी माझी शुश्रूषा त्याने केली. मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही. वडिलांचं छत्र हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकापासून पण दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता. पक्षातून बाहेर पडणं, यापेक्षा माझं घरातून बाहेर पडणं, त्याचं जास्त होतं. बाळासाहेब केशव ठाकरे…माझा काका…माझं बालपण, तरुणपण त्याने व्यापलं होतं. तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला.
बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं. मी जेव्हा राजकीय आंदोलनात उतरलो तेव्हाही बाळासाहेबांचं माझ्याकडे बारीक लक्ष असायचं. एक प्रसंग सांगायलाच हवा. प्रसंग आहे माझ्या पहिल्या जाहीर भाषणाचा.
१९९१ सालची गोष्ट. काळा घोडा इथे फीवाढीच्या विरोधात मी मोर्चा काढला होता. मोर्चा झाला, भाषणं झाली आणि सगळी पांगापांग होत असताना कुणीतरी येऊन सांगितलं की, आमची माँ (मीनाताई ठाकरे) आली आहे. मोर्च्यामध्ये माँ कशासाठी आली असा प्रश्न पडला, म्हणून जाऊन भेटलो, तर कळलं की माँ गाडीत बसून माझं भाषण ऐकत होती. दुपारचे तीन वाजले होते. तिने सांगितलं की घरी चल, काका वाट बघतोय. मी तिच्याबरोबर गेलो, बाळासाहेबांनी समोर बसवलं आणि म्हणाले की, मी तुझं भाषण ऐकलं. आता ११ साली लाईव्ह भाषण वगैरे ऐकायची कुठलीही सोय नव्हती, मग बाळासाहेबांनी भाषण कसं ऐकलं हे मी त्यांना विचारलं तर कळलं की, मौर्चा होता तिथे बाजूला पानटपरीमध्ये पब्लिक फोन होता. तिथून कोणीतरी फोन करून लाऊडस्पीकरवरून माझं भाषण बाळासाहेबांना ऐकवलं होतं !
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राह
पुढे बाळासाहेबांनी जे सांगितलं ते जसंच्या तसं माझ्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे. बाळासाहेब म्हणाले, “आपण किती हुशार आहोत. ते न सांगता समोरचे कसे हुशार होतील हे आपल्या भाषणातून गेलं पाहिजे. आज मी त्यांना विचार करायला काय दिलं ते महत्त्वाचं… ज्या मैदानावर सभा असेल, त्या मैदानाची भाषा बोल, आपली भाषा बोलू नकोस. इलकं सोपं बोल की कुंपणावर बसलेल्या शेतकऱ्यालाही कळलं पाहिजे.”